पुणे : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा युद्धघोष असणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या तेजस्वी काव्याच्या निर्मितीचे 150वे वर्षे सुरू होत असल्याच्या निमित्ताने ‘वंदे मातरम् 150’ या अभिवाचनात्मक दृकश्राव्य विशेष कार्यक्रमाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वंदे मारतम्चे संशोधक-अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
‘वंदे मातरम्’च्या निर्मितीचे 150वे वर्ष दि. 7 नोव्हेंबर रोजी सुरू होत असल्याने जन्मदा प्रतिष्ठान निर्मित, मल्हार प्रॉडक्शन प्रकाशित आणि ग्राहक पेठ आयोजित ‘वंदे मातरम् 150’ हा अभिवाचनात्मक दृकश्राव्य कार्यक्रम शुक्रवार, दि. 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे. ‘वंदे मातरम्’ निर्मितीच्या 150व्या वर्षानिमित्ताने भारतीय इतिहास संकलक समिती, पुणे विभागातर्फे येत्या वर्षात पुण्यासह महाराष्ट्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ ‘वंदे मातरम् 150’ या अभिवाचनात्मक दृकश्राव्य कार्यक्रमाद्वारे होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता लेखन वंदे मातरम्चे संशोधक-अभ्यासक मिलिंद सबनीस यांचे असून कार्यक्रमाचे दिग्दर्शन प्रसाद कुलकर्णी यांचे आहे. ‘वंदे मातरम्’च्या निर्मितीचा इतिहास आणि 150 वर्षातील ‘वंदे मातरम्’ संदर्भातील ठळक नोंदी दृकश्राव्य माध्यमातून पाहता येणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून मोफत प्रवेशिका भरत नाट्य मंदिर आणि ग्राहक पेठ, टिळक रोड येथे उपलब्ध आहेत.