पुणे : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा वाढदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्ताने न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् मध्ये तब्बल २ हजार पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या पुस्तकांमधील एका गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचत त्यातील संदेश समजून घेण्याचा प्रयत्न केला.
प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांसह इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. वाचनाचे महत्व समजून घेण्यासोबतच विविध लेखकांची पुस्तके देखील विद्याथ्र्यांनी यानिमित्ताने वाचली. तसेच डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जीवनपट देखील समजून घेत त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, वाचन आपल्याला जगायला शिकवते. आज सगळे जण मोबाईलचे फॅन आहेत. मोबाइल मधून बाहेर या आणि पुस्तकांच्या सानिध्यात रहायला हवे. वाचन प्रेरणा दिन हा भारतात साजरा होतो. माणसाच्या कपडयांनी मोठेपणा दिसत नाही, तुमच्या विचार दिसतो. अशा डॉ. कलाम यांचा हा आदर्श आपण प्रत्येकाने घ्यायला हवा. डॉ. कलाम ज्या ज्या देशात जायचे तेथे त्यांना डॉक्टर पदवी मिळाली. त्यांच्याकडे २५०० पुस्तके आणि ४० डॉक्टरेट पदवी होती, बाकी संपत्ती त्यांच्याकडे नव्हती, असेही त्यांनी सांगितले.