पिंपरी, पुणे (दि. १५ ऑक्टोबर २०२४) मुस्लिम समाजाच्या मज्जिद, दर्गा व मदरसे यांच्यावर धार्मिक भेदभावावर आधारित कारवाई करण्यात येत असल्याने अशा प्रकारची कोणतीही कारवाई कोणत्याच धार्मिक स्थळांवर करू नये या प्रमुख मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मुस्लिम जमात च्या वतीने शुक्रवारी (दि.१८) दुपारी २ः३० वाजता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन समोर मूक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती आंदोलनाचे समन्वयक हाजी याकूब शेख यांनी दिली.
मंगळवारी (दि.१५) चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत समन्वयक राहुल डंबाळे, हाजी युसुफ कुरेशी, हाजी सय्यद गुलाम रसूल, शहाबुद्दीन शेख, मौलाना एहसान खान फैजी, ख्वाजा भाई शेख, हाफिज अझहर ईशाती, फैयाज सनदी, युनूस शेख, सालर शेख, समीर खान, युनूस बेग आदी उपस्थित होते.
या मूक धरणे आंदोलनामध्ये पन्नास हजार मुस्लिम समाज बांधव सहभागी होतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
राहुल डंबाळे यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांमध्ये पिंपरी, चिंचवड तसेच शहरातील अन्य भागांमध्ये मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली धार्मिक आधारावर कारवाई सुरू आहे. शहरातील अन्य धर्मीयांची धार्मिक स्थळे तसेच व्यावसायिक तसेच अन्य अनधिकृत बांधकामे यांच्यावर कारवाई न करता, हेतूता मुस्लिम समाजावरच कारवाई करणे अन्यायकारक आहे, असे वाटत असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील विविध पक्ष संघटना व सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मुस्लिम जमात च्या वतीने मूक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या अनुषंगाने आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी ३० पेक्षा अधिक बैठका झाल्या आहेत तर आणखी २० बैठका होणार आहेत. शहरातून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे.
पिंपरी चिंचवड शहरांमध्ये अनाधिकृत बांधकामांची संख्या ही मोठी असून एकूण ही अनियमित व अतिक्रमित असताना तसेच अन्य धार्मिक स्थळे देखील बेकायदेशीर व अनधिकृत असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता केवळ विशिष्ट समुदायावरच कारवाई करणे अन्यायकारक आहे. हे कायद्यातील समानतेच्या धोरणाचे उल्लंघन आहे. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही भेदभावपुर्वक कारवाई करू नये अशी विनंती मनपा आयुक्त यांना करण्यात येणार आहे. या पआंदोलनाला विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिला असून ते सकारात्मक वृत्तीने या मोर्चात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोर्चा आयोजकांची दोनदा भेट घेतली असून, सदर भेटीमध्ये त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना अशा प्रकारची भेदभावपूर्वक कारवाई करू नये अशा प्रकारचे भावना जर मुस्लिम समाजामध्ये झाली असेल तर त्याची गंभीर दखल घेऊन त्यांचे समाधान करावे अशी सूचना केली आहे. त्यानंतर मोर्चाच्या अनुषंगाने आज मंगळवारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे व मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली होती. यात आंदोलनाचे आयोजक सुसुफ शेख, याकुब शेख, शहाबुद्दीन शेख, हाजी गुलाम रसुल व राहुल डंबाळे हे सहभागी होते. सुमारे एक तास चाललेल्या बैठकीमध्ये मनपा आयुक्त यांच्याकडे धार्मिक स्थळांच्या बांधकामांच्या सोबतच मुस्लिम समाजाच्या अन्य प्रलंबित मागण्यासंदर्भामध्ये सुद्धा चर्चा करण्यात आली असून यासंदर्भामध्ये लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान १८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मूक धरणे आंदोलनाला पिंपरी चिंचवड शहरातील विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असणाऱ्या मुस्लिम समाज बांधवां समवेतच पुणे शहर, पुणे जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील धार्मिक संघटनांकडून व सामाजिक संघटनांकडून पाठिंबा मिळालेला आहे. आंदोलन हे पूर्णतः मूक धरणे आंदोलन असल्यामुळे या आंदोलनात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत तसेच या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात भाषणे केली जाणार नाहीत. केवळ प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये महानगरपालिका आयुक्तांना मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार असून त्याच्या पाठपुराव्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.