पुणे : विजयादशमीच्या मुहुर्तावर लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनच्या बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर, प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, सुप्रसिद्ध लेखिका मीना प्रभू आदी उपस्थित होते.
लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनच्या कार्यकरिणीत आभा औटी, मृण्मयी मोहन, सुनील महाजन, किरण केंद्रे, रघुनंदन लेले, मुकुल मारणे यांचा समावेश आहे.
मराठी भाषेचा सर्वांगिण विकास व्हावा आणि सर्व कलांना वाव मिळावा हा करिता पुणे शहरात लोकमान्य कल्चरल फाऊंडेशन सारख्या संस्थांची आवश्यकता होती, असे प्रतिपादन मृणाल कुलकर्णी यांनी केले. कला, साहित्य, नृत्य, संगीत यावर आधारित कार्यक्रम करताना नवीन कलाकृती रसिकांसमोर आणण्यास फाऊंडेशनची नक्कीच मदत होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
मीना प्रभू म्हणाल्या, लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी झाल्याने मला मराठी असल्याचा अभिवान वाटत आहे. जगभरात प्रवास केल्यानंतरही मला मराठी भाषेविषयी अभिमान वाटतो. त्यामुळे या फाऊंडेशनच्या माध्यमातून मला कार्य करण्यास नक्कीच आवडेल.
महाराष्ट्रातील लप्तु होऊ लागलेल्या लोककला आणि साहित्यकृतींना आपण एक चांगला मंच देऊ तसेच संगीत, नृत्य, कला, साहित्य या विषयांवरील कार्यशाळा आणि उपक्रमांचे लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजन करू, अशी ग्वाही फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अद्विता उमराणीकर, आभार प्रदर्शन किरण केंद्रे यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन मुकुल मारणे यांनी केले.