अभिजात संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांची भावना
गुणीजान बंदिश स्पर्धा मंगळवारपासून पुण्यात रंगणार
पुणे : बंदिश ही कलाकाराची ओळख असते. अमूर्त गायकी बंदिशीच्या माध्यमातून मूर्त होत असते. पारंपरिक बंदिशींपेक्षा वेगळे, नवीन असे सांगीतिक विधान, हे ज्यांच्या बंदिशींचे वैशिष्ट्य आहे, त्या पंडित सी. आर. व्यास यांच्या बंदिशी नव्या पिढीतील कलाकारांकडून ऐकण्यासाठी आम्ही कलाकार म्हणून उत्सुक आहोत, अशी भावना अभिजात संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आज (दि. 14) येथे व्यक्त केली.
गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन (ग्रेस) फाउंडेशनतर्फे प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या 100व्या जयंतीनिमित्त देशपातळीवर गुणीजान बंदिश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयी आज पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
पंडित व्यास यांच्या बंदिशींवर आधारित या स्पर्धेची उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी दि. 15 ते 19 ऑक्टोबर 2024 या कालावधीत डॉ. श्रीराम लागू रंगावकाश, हिराबाग, पुणे (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे होणार आहे. स्पर्धेविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी गायन-वादन क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षक ज्येष्ठ गायिका अभिनेत्री निर्मला गोगटे, पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, पद्मभूषण पंडित साजन मिश्रा, पंडित सुहास व्यास, पद्मश्री पंडित सतिश व्यास याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजक शशी व्यास, संकल्पक अपर्णा केळकर यांनी पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी ज्योती व्यास, गेयता व्यास, मकरंद केळकर आदी उपस्थित होते.
अंतिम फेरीत पोहोचलेल्यांची स्पर्धा दि. 15 ते दि. 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीत डॉ. श्रीराम लागू रंग अवकाश सभागृह, हिराबाग, पुणे येथे सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 आणि दुपारी 2:30 ते रात्री 8:30 या कालावधीत होणार असून अंतिम स्पर्धा दि. 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपासून सुरू होणार आहे. तर पारितोषिक वितरण समारंभ दि. 20 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला असून बक्षीस वितरण मान्यवर परीक्षक कलाकारांच्या हस्ते होणार आहे. 16 ते 30 वयोगटातील गायकांसाठी आयोजित या स्पर्धेत 125 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या 50 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. यात 25 मुली आणि 25 मुले आहेत. अंतिम फेरीही स्त्री आणि पुरुष अशा स्वतंत्र गटात होणार असून पहिल्या फेरीतून दहा, दुसऱ्या फेरीतून सहा तर तिसऱ्या फेरीतून प्रत्येकी तीन स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी केली जाणार आहे.
गायक कलाकारांच्या सादरीकरणप्रसंगी रसिकांना उपस्थित राहता येणार आहे. सर्वांना मोफत प्रवेश आहे.
पंडित सुहास व्यास म्हणाले, वडिल पंडित सी. आर. व्यास यांच्या बंदिशी त्यांच्या सृजनशीलतेचा आविष्कार आहेत. अर्थपूर्ण, चुस्त आणि आकर्षक मुखडे, हे त्यांच्या बंदिशींचे वैशिष्ट्य आहे. स्पर्धेच्या निमित्ताने युवा पिढीत या बंदिशींचा प्रसार होईल, याचा आनंद आहे.
पंडित साजन मिश्रा म्हणाले, संगीतात अखंड रमणारे असे पंडित सी. आर. व्यास यांचे व्यक्तिमत्त्व होते. वाग्गेयकार हे त्यांचे रूप त्यांच्या बंदिशींमधून साकार झाले आहे. आपल्या बुजुर्गांनी शेकडो उत्तमोत्तम बंदिशींच्या रूपाने सांगीतिक बँक निर्माण केली आहे. नव्या कलाकारांनी या रचना आपल्याशा कराव्यात.
विदुषी निर्मला गोगटे यांनी गुरू पंंडित सी. आर. व्यास यांच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा आणि समर्पित वृत्तीने केलेल्या संगीत साधनेचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
पंडित उल्हास कशाळकर म्हणाले, परंपरा आत्मसात करून, नवीन ठेवण असणारी रचना, हे पंडित सी. आर. व्यास यांच्या बंदिशींचे वेगळेपण आहे. बंदिशींच्या माध्यमातून गाण्याकडे वेगळ्या दृष्टीने कसे पाहता येते, याचा अनुभव या बंदिशी देतात.
पंडित सतीश व्यास यांनी युवा पिढी आमच्या वडिलांच्या बंदिशींचा अभ्यास करत आहे, हे महत्त्वाचे वाटते, अशी भावना व्यक्त केली.
पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, बंदिश या विषयावर राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा घेणे हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कलाकाराचे सांगीतिक विधान बंदिशींच्या माध्यमातून समोर येते. बंदिशींची रचना करताना बंदिशीचा विषय, भावाभिव्यक्ती, रागांग, तालांग असे कित्येक घटक असतात. या साऱ्या घटकांना स्पर्धक कसे न्याय देतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
पंडित सी. आर. व्यास यांच्या शिष्या, प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.
शशी व्यास यांनी पंडित सी. आर. व्यास यांच्या बंदिशींच्या माध्यमातून युवा पिढीतील कलाकार राष्ट्रीय पातळीवर एकत्र यावेत, कलात्मक पातळीवर आशय व संवाद घडावा, कलाकारांना आत्मविश्वास मिळावा, हा स्पर्धेचा हेतू असल्याचे नमूद केले. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी घेण्याचा मानस असल्याचे सांगितले.