दबाव आणला तर पोलिस काम कसे करणार?
येवला-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवरुन छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याची देखील आहे, असे भुजबळ म्हणाले. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. अशात छगन भुजबळ यांनीही सरकारला घरचा आहेर दिला आहे. पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे, अशी सूचना देखील भुजबळ यांनी दिली आहे. ते नाशिकच्या येवल्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले, बाबा सिद्दिकी यांची हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे. 10-12 हजारांत पोरं हत्या करतात. पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे. मी तुमच्या पाठीमागे उभा राहिल. तुम्ही काय करतात हे मी विचारणार नाही. पण जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांची विल्हेवाट लावा. मात्र ही केवळ गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्यांची देखील जबाबदारी आहे, असे भुजबळ म्हणाले.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, पोलिस खात्यात योग्यप्रकारचे अधिकाऱ्यांची नेमणूक केली पाहिजे. योग्य अधिकारी कोण आहेत, याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती असते. कुणाला घेतले पाहिजे, कुणाला बाहेर ठेवले पाहिजे, याबाबत त्यांना माहिती असते. त्यांच्यावर आम्ही दबाव आणला, तर पोलिस खाते कसे काम करणार, असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.
बाबा सिद्दिकी यांना अनेक वर्षांपासून ओळखत होतो. त्यांना धमकी मिळाल्यानंतर वाय सुरक्षा देण्यात आली होती. पण फक्त सुरक्षा देऊन काही होत नाही. धमकी कोणी दिली याचा तपास करणे गरजेचे होते. भायखळा येथील तालुका प्रमुखांची देखील निघृ्ण हत्या झाली होती. या हत्या म्हणजे मुंबई पोलिसांसाठी एक चॅलेंज आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.