टाटा ट्रस्टने दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. बोर्डाने त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले.सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कुणाची निवड होणार? हा प्रश्न ऐरणीवर आला होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. टाटा ट्रस्टने शुक्रवारी बोलावलेल्या एका बैठकीत नवे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट व टाटा ट्रस्टमधील एक विश्वस्त आहेत. त्यांची कार्यशैली रतन टाटा यांच्याहून फार वेगळी आहे. त्यांना प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे आवडते.
नोएल हे टाटा समूहाची कंपनी ट्रेंट व व्होल्टासचे अध्यक्ष
नवल व सिमोन टाटा यांचे सुपुत्र नोएल हे सध्या ट्रेंट, व्होल्टास, टाटा इन्व्हेस्टमेंट्स आणि टाटा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आहेत. ते टाटा स्टील आणि टायटनचे उपाध्यक्षही आहेत.₹13.8 लाख कोटींच्या समूहात टाटा ट्रस्टचा वाटा 66%टाटा ट्रस्ट ही टाटा समूहाच्या धर्मादाय संस्थांचा एक समूह आहे. सुमारे 13 लाख कोटींच्या महसूलासह त्याचा टाटा समूहात तब्बल 66% वाटा आहे. टाटा ट्रस्टमध्ये सर रतन टाटा ट्रस्ट व अलाइड ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट व अलाइड ट्रस्टचा समावेश आहे. दारिद्र्य निर्मुलन, आरोग्य सेवा व शिक्षणावर लक्ष केंद्रीत करणारा हा ट्रस्ट रतन टाटा यांच्या वारशाचा अभिन्न अंग आहे.
रतन टाटांनी सुप्रीम कोर्टातील सुनावणीत उत्तराधिकाऱ्याविषयी नोंदवले होते मत
उल्लेखनीय बाब म्हणजे रतन टाटा यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याविषयी सुप्रीम कोर्टात एका सुनावणीत स्पष्ट मत नोंदवले होते. सध्या मी या ट्रस्टचा अध्यक्ष आहे. पण भविष्यात दुसरी एखादी व्यक्ती माझ्या जागी असेल. त्याचे नाव टाटा हेच असावे हे गरजेचे नाही. एका व्यक्तीचे आयुष्य फार मर्यादित असते. पण संघटना नेहमीच कार्यरत असते, असे ते म्हणाले होते.
उल्लेखनीय बाब म्हणजे रतन टाटा हे टाटा ट्रस्ट व टाटा सन्सचे अध्यक्षपद एकाचवेळी सांभाळत होते. ही दोन्ही पदे सांभाळणारे ते एकमेव व्यक्ती होते. त्यानंतर 2022 मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळाने सर्वानुमते त्यांच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये एक सुधारणा केली होती. त्यानुसार एकच व्यक्ती या दोन्ही पदांवर राहणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती. उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यासोबतच्या कायदेशीर लढाईमुळे हा निर्णय घेण्यात आला होता.
स्वतःच्या उत्तराधिकाऱ्याविषयी रतन टाटांना काय वाटत होते?
रतन टाटा यांनी यांनी आपल्या टाटायन नामक पुस्तकातून आपल्या उत्तराधिकाऱ्याविषयी मत व्यक्त केले होते. आपला उत्तराधिकारी द्रष्टा हवा. त्याच्याकडे भविष्यवेधी नजर हवी. किमान पुढील 2-3 शतके त्याला समूहाचे नेतृत्व करता यावे अशा वयाचा तो असावा. विशेषतः आपल्या उत्तराधिकाऱ्याला अहंभाव नसावा. कारण एक व्यक्ती म्हणून एवढ्या मोठ्या व्यवसायाचा प्रमुख म्हणून त्याच्या अहंकार उत्पन्न होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या संभाव्य उत्तराधिकाऱ्याकडे असा दुर्गुन नसावा, असे रतन टाटा यांना वाटत होते. यावरून रतन टाटा यांना आपला उत्तराधिकारी केवळ नेमायचा म्हणून नेमण्यात कोणताही रस नव्हता हे स्पष्ट होते.