पुणे-पश्चिम पुण्याचे सर्वात मोठे चांदणी चौक कोथरूड येथील अग्निशमन केंद्र सुरू होणार कधी? असा सवाल करत आजमितीस पश्चिम पुणे शहरातील सर्वात मोठे चांदणी चौक, मौजे कोथरूड येथील अग्निशमन केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यासाठी पुणे मनपाचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची पुणे – अर्बन सेलच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि तांत्रिक गोष्टींवर सविस्तर चर्चा करत लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली.यावेळी पुणे अर्बन सेलचे शहराध्यक्ष स्वप्नील दुधाने, अर्बन सेलच्या खडकवासला अध्यक्ष मीनल धनवटे, अर्बन सेलचे कोथरूड अध्यक्ष सचिन यादव, कोथरूड महिला अध्यक्षा ज्योती ताई सूर्यवंशी, अर्बन सेलचे सदस्य गणेश ठोंबरे आणि विशाल शेडगे उपस्थित होते.
यासंदर्भात पुणे अर्बन सेलचे शहराध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी सांगितले कि,’ कोथरूडमधील चांदणी चौक, सर्व्हे नं. ७७/१ या ठिकाणी पुणे मनपाच्या वतीने पश्चिम पुणे शहरातील सर्वात मोठे अग्निशमन केंद्र बांधण्यात आले असून या ठिकाणी ५ अग्निशमन वाहने उपलब्ध असणार आहेत. शहरातील संपूर्ण कोथरूड, बावधन, पाषाण, बालेवाडी, सुस, भुगांव, म्हाळुंगे आणि वारजे महामार्ग येथील अनेक भाग या केंद्राखाली समाविष्ट होत असूनही सदर अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आलेले नाही.
दि. २२ फेब्रुवारी २०१९ रोजी पुणे बांधकाम विभाग – मनपाकडून अग्निशमन केंद्राला परवानगी प्राप्त झाली असता भवन विभाग, मनपाकडून तब्बल ५६ गुंठे जागेत या अग्निशमन केंद्राच्या आरक्षित जागेवर कामास सुरवात केली. आज या केंद्राचे काम पूर्णत्वास जाऊनही तांत्रिक गोष्टींमुळे ते सेवेत उपलब्ध करण्यात आलेले नाही. याबाबत खडकवासला विधानसभा अर्बन सेलचे अध्यक्ष मीनल ताई धनवटे आणि कोथरूड अर्बन सेलचे अध्यक्ष सचिन यादव यांनी पाठपुरावा केला असता अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला. मनपाच्या मालमत्ता विभागाने सदर जागा ताब्यात घेऊन भवन विभागाने सहा वर्षांत काम पूर्ण केले आहे.
परंतु काम पूर्ण झाल्यानंतर मनपाच्या बांधकाम विभागाकडून अंतिम भोगवटापत्र घेणे आवश्यक असून तसेच ते अग्निशमन विभागाला हस्तांतरीत न केल्याने पुढ़ील अग्निशमन केंद्र सुरू करण्याचे काम स्थगित झाले आहे. यावेळी मनपाचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले तसेच भवन विभागाचे मुख्य अधिकारी युवराज देशमुख यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी सदर प्रश्नाचे लवकरात लवकर निवारण करण्यात यावे, अशी विनंती केली. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित बांधकाम विभागाला अंतिम भोगवटापत्र देण्याबाबत लगेच फोनवर सूचना दिल्या आणि लवकरात लवकर केंद्र सुरू करत नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.यामुळे शहरातील मोठा परिसर सुरक्षित बनणार असून नागरिकांना अग्निशमन सुविधा उपलब्ध होणार आहे. सदर घटनेत त्वरित उपाययोजना केल्याबद्दल आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचे पुणे अर्बन सेलने आभार मानले असुन सेलच्या माध्यमातून घेतलेली ही भूमिका नागरिकांच्या कल्याणासाठी असून भविष्यात यामुळे नागरिकांना सुरक्षितता प्राप्त होणार आहे. असे दुधाने यांनी म्हटले आहे.