पुणे -शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याचे कारणावरुन झालेल्या वादातून तरुणावर चाकूने जीवघेणा वार केल्याची घटना टिळक रस्त्यावर घडली. याप्रकरणी आराेपी विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुण्यातील भवानी पेठेतील कासेवाडी, तसेच लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौक परिसरात देखील अशाचप्रकारे दोन जणांवर वार करण्यात आले.
कुणाल परमेश्वर बनसोडे (वय 23, रा. चंदन हाॅस्पिटलसमोर, डायस प्लाॅट, गुलटेकडी, पुणे) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. स्वप्नील मंगेश मोरे (वय 23, रा. चंदन हाॅस्पिटलसमोर, डायस प्लाॅट, गुलटेकडी,पुणे) याने याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल आणि स्वप्नील टिळक रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत नृत्य करत होते. त्यावेळी गर्दीत धक्का लागल्याने एका अनोळखी तरुणाबरोबर मोरे आणि बनसोडेचा वाद झाला. त्यानंतर बनसोडेला आरोपीने गर्दीतून बाहेर ओढून त्याला शिवीगाळ केली. बनसोडेचा मित्र मोरे याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अनोळखी तरुणाने बनसोडेच्या पोटावर चाकूने वार केले.
तर,भवानी पेठेतील कासेवाडी भागात मिरवणुकीत किरकोळ वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. निखिल अविनाश चौधरी (वय 25, रा. भगवा चौक, कासेवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जईद तांबोळी, बिलाल खान, लतीफ शेख, चुव्वा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. निखिल कासेवाडीतील राजीव गांधी मित्र मंडळाच्या मिरवणुकीत नाचत होता. त्यावेळी झालेल्या वादातून निखिल याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले.
स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ मिरवणुकीत नाचताना झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्या डाेक्यात कठीण वस्तूने प्रहार करण्यात आला. मनोज नाथ मिझार (वय 23, रा. मुकुंदनगर, स्वारगेट) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मोहन भगत सोनार आणि राकेश भगत सोनार (दोघे रा. मुकुंदनगर, स्वारगेट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.