जिथे राहुल गांधींबद्दल अशा धमक्या दिल्या जातात तिथे सामान्य माणूस किती दहशतीखाली असेल ?
मुंबई-लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना भारतीय जनता पक्षातील नेते उघड उघड धमक्या देत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे. नरेंद्र मोदींच्या दोन मंत्र्यांनी राहुल गांधींवर मुक्ताफळे उधळल्यानंतर आता राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनीही राहुल गांधी यांच्याबद्दल खालची पातळी गाठली आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या अनिल बोंडेला तात्काळ अटक करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आमदार संजय गायकवाड व भाजपाचा खासदार अनिल बोंडे यांच्यावर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे पण राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. विरोधी पक्षनेत्याला धमक्या देणे हा सत्तेचा माज आहे पण हा माज जास्तकाळ चालणार नाही. महायुतीचे सरकारच गुंडांना प्रोत्साहन देत आहे, अशा गुंडांना त्यांच्याच भाषेत उत्तर देता येते पण काँग्रेसची ती संस्कृती नाही, ही संस्कृती भाजपाची आहे व एकनाथ शिंदे यांच्या पक्षालाही त्याची लागण झालेली आहे. सुमारदर्जाचे हे लोक सवंग प्रसिद्धीसाठी राहुल गांधींना धमक्या देत आहेत. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याची या लोकांची औकात नाही. भाजपा शिवसेनेच्या या अपप्रवृत्तीला जनताही धडा शिकवेल, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
राजकारणात वैचारिक मतभेद असतात, त्यावर टीका केली जाते पण थेट जीवे मारणे, अतिरेकी म्हणणे, जीभ कापा, चटके द्या, अशी भाषा करणे ही मानसिक विकृती आहे आणि ही विकृती भाजपामध्ये मागील १० वर्षात जास्तच वाढीस लागली आहे, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे हे त्यापेक्षा अत्यंत घातक आहे. खासदार राहुल गांधी यांना धमकी दिल्याबद्दल भाजपा व शिंदे शिवसेनेच्या नेत्यांकडून साधा निषेधही केला नाही यातून अशा प्रवृत्तींना भाजपा शिंदेसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचाही पाठिंबा असल्याचे दिसते असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.