पुणे : पुण्यामध्ये आणखी एका गोळीबाराची घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात असलेल्या फिनिक्स मॉलच्या गेट नंबर 7च्या रोडवर हा गोळीबार करण्यात आला आहे. पांढऱ्या गाडीतून येऊन एका व्यक्तीने हवेत गोळीबार केला आहे. या प्रकरणी वाकड पोलीस घटनास्थळी पोहोचले असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.
एकीकडे महाराष्ट्रात गणपती विसर्जनाची धामधूम सुरू आहे. लाडक्या बाप्पांना वाजत गाजत निरोप दिला जात आहे. ढोल ताशांच्या गजरात गणपती विसर्जन सुरू असतानाच पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. गणपती विसर्जनावेळी मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.पुणे-बंगळुरू हायवेलगत असलेल्या फिनिक्स मॉलच्या गेट नंबर 7 जवळ संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. फिनिक्स मॉलमध्ये सध्या काम सुरू आहे, इकडे काम करणाऱ्या अविनाश नावाच्या कामगाराला एक व्यक्ती भेटायला आला. अविनाश या व्यक्तीला भेटून गेल्यानंतर त्याने हवेत गोळीबार केला. या आरोपीनं नेमका गोळीबार का केला? याचा शोध पोलीस घेत आहेत.