एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांचा समाजवादी पक्षात प्रवेश
भाजपने हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण करून देशाला मागे टाकले
देवेंद्र फडणविसांच्या आशीर्वादानेच नितेश राणेंच्या मुस्लिमांना धमक्या
पुणे (कोंढवा) प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध राजकारण देशाला घातक आहे. मुस्लिम समाज भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये भीतीच्या वातावरणात जगत असून सर्वधर्मसमभावाची भावना ठेवून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही महाराष्ट्र विकास आघाडी सोबत आहोत. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये समाजवादी पक्षाची ताकद असून या मतदार संघात उमेदवार उभा केल्यास निश्चितच येथून समाजवादी पक्षाचा आमदार निवडून येईल अशी आशा व्यक्त करतानाच समाजवादी पक्ष हडपसर विधानसभा मतदार संघा सह महाराष्ट्रात विधानसभेच्या 12 जागा लढवणार असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आजमी यांनी दिली.
समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव अनिस अहमद यांच्या हडपसर विधानसभा मतदार संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अबू आजमी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सलीम मुल्ला, हबीब शेख, इमरान शेख, असिफ शेख यांसह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सलीम मुल्ला यांच्यासह शेकडो एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी यावेळी अबू आझमी यांच्या उपस्थितीत झालेल्या जनसंवाद सभेमध्ये समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला.
भारतीय जनता पक्षाने हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण करून देशाला मागे टाकले आहे. समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेश मध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये चांगली कामगिरी केली त्याचाच परिणाम म्हणून चारशे पार चा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्ष केवळ 240 जागा मिळवू शकला. उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही समाजवादी पक्षाचा मतदार आहे. आगामी विधानसभा मतदारसंघासाठी मुंबईतील तीन विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्र मध्ये पक्ष 12 जागांवर उमेदवार उभे करणार आहे आणि त्या संदर्भात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झालेली आहे.
भारतीय जनता पक्षातील आमदार नितेश राणे यांच्यासारख्या नेत्यांनी मुस्लिमांविरोधात भूमिका घेऊनही भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही? याचाच अर्थ त्यांच्या बोलण्यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्ष आणि आरएसएस असल्याचे दिसून येते. परंतु मुस्लिम समाज अशी वक्तव्य कदापी सहन करणार नाही असा इशाराही अबू आजमी यांनी यावेळी दिला. मुस्लिम बांधवांचा एमआयएम पक्षावरील विश्वास कमी होत आहे. एमआयएम पक्ष हा केवळ मुस्लिम बांधवांना राजकारणासाठी वापर करून घेतो आणि नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो हे मुस्लिम बांधवांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील लाखो मुस्लिम बांधव हे एमआयएम सोडून समाजवादी पक्षाकडे आकर्षित होत आहे. त्याचा फायदा निश्चितच महाविकास आघाडीला होईल असा विश्वासही अबू आजमी यांनी यावेळी व्यक्त केला.
अनिस अहमद म्हणाले, हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये समाजवादी पक्षाला अतिशय अनुकूल वातावरण आहे. या मतदारसंघांमध्ये पूर्वी समाजवादी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत. तसेच येथील जनतेला समाजवादी पक्षावर विश्वास आहे. त्यामुळेच यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून समाजवादी पक्षाचा आमदार हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये निवडून येईल याची आम्हाला खात्री वाटते.
सलीम मुल्ला म्हणाले, एमआयएम पक्ष पुण्यामध्ये स्थापन करण्यात आणि वाढविण्यात माझ्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे, परंतु एमआयएम पक्षाने आमची फसवणूक केली आहे. पक्षाने मुस्लिम बांधवांची मते केवळ राजकारणासाठी वापर करून घेतली आणि त्यांनी नंतर समाजाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले या त्यांच्या वापरा आणि फेकून द्या या नीतीमुळेच शेकडो मुस्लिम बांधव हे एमआयएम सोडून समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहे.