मुंबई- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने आज एक व्हिडीओ समाज मध्यामावर पोस्ट करत राज्यात गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय त्यामुळे गुन्हेगारी वाढल्याचा आरोप केला आहे . एक व्यक्ती एलेका मोटार चालकावर भर रस्त्यात कुठल्यातरी हत्याराने हल्ला करताना दिसत असल्याचा हा व्हिडीओ आहे . आणि तो शिंदे गटाच्या आमदार महेंद्र थोरवे यांचा शिवा नावाचा बॉडी गार्ड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रस्त्यावर हा हल्ला होताना पाहून लोक गुमान बाजूने जाताना दिसत आहेत .. काय आहे हि पोस्ट पहा जशीच्या तशी …..
या पोस्ट मध्ये नेमके काय म्हटले आहे ….
महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या ‘शिवा’ नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही… कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल! ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीये! कायदा-सुव्यवस्थेची वाट लागलीये! कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय!
दुसरीकडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी आमदार थोरवेंवर निशाणा साधत ही सत्तेची मस्ती असल्याची टीका केली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी आमदार थोरवेंवर निशाणा साधला आहे. मारहाण करणारा व्यक्ती कोणत्या आमदाराचा अंगरक्षक आहे किंवा नाही मला त्यात रस नाही. पण एखाद्या व्यक्तीला भररस्त्यात अशी मारहाण करण्याची हिंमत होते ही फार गंभीर गोष्ट आहे. या घटनेवरून राज्यात कायदा सुव्यवस्था नावाची गोष्टच अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट होते, असे अंधारे म्हणाल्या.
आमदार महेंद्र थोरवेंनी फेटाळले आरोप
दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांनी मारहाण करणारा व्यक्ती आपला बॉडीगार्ड नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच हा प्रकार 2 कार्यकर्त्यांमधील वादाचा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ठाकरे गटाने मला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. मारहाण करणारा व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. पण ते दोघेही आमचेच कार्यकर्ते आहेत. त्यांच्यातील वादातून हा प्रकार घडला असावा. या प्रकरणी त्यांनी काही चुकीचे कृत्य केले असेल तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणालेत.