शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ व खडक पोलीस स्टेशनचा उपक्रम
पुणे : शहराच्या पूर्व भागातील चौका-चौकात महिलांनी केलेले औक्षण, फुलांची झालेली उधळण आणि भारत मातेचा जयघोष ऐकून सैनिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन दिव्यांग सैनिक आणि पोलिसांसोबत देशभक्तीचा नारा दिला. हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत दिव्यांग सैनिकांसमवेत राष्ट्रभक्तीचा आणि एकतेचा संदेश देत सद्भावना रॅली काढली.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि खडक पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण कुमार पाटील, कर्नल वसंत बल्लेवार, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, विनायक घाटे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, अॅड प्रताप परदेशी, डाॅ. मिलींद भोई, डॉ. विजय पोटफोडे, राजाभाऊ कदम, खडक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, शर्मिला सुतार, सेवा मित्र मंडळ अध्यक्ष पराग शिंदे, अमर लांडे, निलेश रसाळ, विक्रांत मोहिते, सचिन ससाने, उमेश कांबळे, पोलीस अधिकारी नामदेव गायकवाड, कुलदीप पवार उपस्थित होते.
घोरपडी पेठेतील मक्का मस्जिद- दलाल चौक- बलवार आळी – कृष्णाहट्टी चौक – शितला देवी चौक – फडगेड पोलीस चौकी मार्गे सेवा मित्र मंडळ, शुक्रवार पेठ येथे रॅलीचा समारोप झाला. देशाच्या रक्षणार्थ अपंगत्व पत्करलेल्या जवानांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
प्रविणकुमार पाटील म्हणाले, आजची परिस्थिती पाहता मुलांमध्ये माणुसकीचे संस्कार रुजविणे गरजेचे आहे. जे काम सामाजिक संस्थाच्यावतीने केले जात आहे. मानवता धर्म हाच खरा मोठा धर्म आहे. पुढच्या पिढीमध्ये देशभक्तीचे संस्कार रुजविले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
शिरीष मोहिते म्हणाले, प्राणाचे बलिदान देऊन सैनिक आपली रक्षा करतात. त्यांची माहिती व्हावी, अपंगत्व आले असूनही त्यांची जिद्द सर्वाना समाजावी, हा उद्देश आहे,. जेव्हा ते सीमेवर लढतात तेव्हा जात, धर्म बघत नाहीत. केवळ देश त्यांना दिसत असतो. तसेच आपणही एकत्र येवून देशभक्ती हाच धर्म पाळला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.