पुणे: स्वारगेट, लोहियानगर, भवानी पेठ परिसरातील कुख्यात गुन्हेगार विशाल सातपुते उर्फ ‘जंगल्या’ याच्या खुनाचा कट उधळण्यात पोलिसांना यश आले. त्याचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गजाआड करण्यात आले आहे.
लोणीकंद पोलिसांनी सात जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून सात पिस्तुले आणि २३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सातपुते याने एकेकाळचा त्याचा साथीदार आणि स्वारगेट भागातील लाईन बॉय गुंड कुणाल पोळ याचा खून केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी हा कट रचण्यात आला होता.
शुभम उर्फ मॅटर अनिल जगताप (वय २७), सुमित उत्तरेश्वर जाधव (वय २६), अमित म्हस्कू अवचरे (वय २७), ओंकार उर्फ भैय्या अशोक जाधव (वय २४), अजय उर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७), राज बसवराज स्वामी (वय २६), लतिकेश गौतम पोळ (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी स्वारगेट आणि लोहियानगर भागात राहणारे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी सासवड येथून दहिहंडीचा कार्यक्रम संपवून घरी निघालेल्या गुंडावर कोलवडी परिसरात हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. हा हल्ला सुमित जाधव आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. आरोपी सुमित हा स्वारगेट परिसरात सक्रिय असलेल्या एन्जाॅय ग्रुपचा सदस्य आहे. आरोपींच्या शोधासाठी चाकण, पिंपरी चिंचवड, मुळशी परिसरात एक पथक पाठविण्यात आले होते. तर, दुसरे पथक सासवड, हडपसर, कोंढवा, कात्रज भागात पाठविण्यात आले होते. आरोपी हडपसर येथे भेकराईनगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस या भागात तळ ठोकून होते.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिम्मत जाधव, साहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, संदीप तिकोणे, कैलास साळुंके, स्वप्नील जाधव, अजित फरांदे, सागर जगताप आणि पथकाने कारवाई करून आरोपींना पकडले. सुरुवातीला शुभम आणि सुमित या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अवचरे आणि हेगडे या दोघांकडून सुरुवातीला दोन पिस्तुले आणि ९ काडतुसे जप्त करण्यात आली. त्यांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली. या कालावधीत त्यांच्याकडून आणखी ३ पिस्तुले आणि १४ काडतुसे आणि ७ मोबाईल जप्त करण्यात आले.
नेहरू रस्त्यावरील सम्राट हॉटेलमध्ये कुणाल पोळ याचा पाच वर्षांपूर्वी खून करण्यात आला होता. विशाल उर्फ जंगल्या सातपुतेच्या साथीदारांनी त्याचा खून केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयामधून जंगल्याची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता झाली होती. मात्र, पोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचे साथीदार तयार होते. जंगल्याच्या खुनासाठी आरोपी सुमित आणि त्याच्या साथीदारांनी कट रचत शस्त्रांची जमवाजमव केली होती.