ऋषी पंचमीनिमित्त सन्मान सोहळा : युवकांचा कोथरूड-रत्न पुरस्काराने गौरव
प्राचीन ललित कला प्रबोधिनी, समस्त ब्राह्मण सेवा संस्थेचा उपक्रम
पुणे : असंतोष, नकारात्मक वातावरण, कलुषित झालेली समाजमने अशा परिस्थितीत ऋषीतुल्य व्यक्तींचा सन्मान आणि युवा पिढीला प्रोत्साहित करण्यासाठी दिलेला पुरस्कार यातून सकारात्मक उर्जा निर्माण होत आहे. हीच भारतीय संस्कृती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुधाकरराव आव्हाड यांनी केले.
प्राचीन ललित कला प्रबोधिनी, पुणे आणि समस्त ब्राह्मण सेवा संस्था, कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने ऋषी पंचमीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार तसेच कोथरूड-रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ॲड. आव्हाड बोलत होते. कोथरूडमधील शिवतीर्थ गणेश मंदिराच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी कृषीमंत्री शशिकांत सुतार अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ अभिनेते, साहित्यिक श्रीराम रानडे, प्राचीन ललित कला प्रबोधिनीचे प्रा. जयराम जोशी, समस्त ब्राह्मण सेवा संस्थेचे अजित फुलंब्रीकर, प्रफुल्ल सुभेदार मंचावर होते.
ज्येष्ठ संत-चित्रकार बाळकृष्ण वाडेकर, आकाशवाणी कलावंत श्याम पोरे, ज्येष्ठ एकपात्री कलावंत, साहित्यिक विश्वास पटवर्धन, ज्येष्ठ वास्तुविशारद, लेखक विवेक सिन्नरकर, शास्त्रीय गायिका विदुषी किशोरी जानोरीकर यांचा ऋषी पंचमीनिमित्त सन्मान करण्यात आला. तर कला क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल डॉ. आशुतोष जातेगावकर (बासरी वादक) व अद्वैत अभ्यंकर (तबला वादक) तसेच यश वाटारकर (बुद्धिबळ पटू) यांचा कोथरूड रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला.
श्रीराम रानडे म्हणाले, साहित्य, संगीत, कला क्षेत्रातील गुरुजनांचा सन्मान तसेच युवा कलावंत व खेळाडूंचा गौरव हा स्तुत्य उपक्रम आहे. अशा उपक्रमांतून भारतीय संस्कृती जपली जात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
अध्यक्षपदावरून बोलताना शशिकांत सुतार म्हणाले, कोथरूड परिसरात अनेक कर्तृत्ववान व मान्यवर व्यक्ती यांचे वास्तव्य असल्याने या उपनगराला वैभव प्राप्त झाले आहे. कोथरूडच्या विकासाला कोथरूडकर नागरिकांची साथ व आशीर्वाद लाभले आहेत.
सत्काराला उत्तर देताना विश्वास पटवर्धन म्हणाले, आपण केलेल्या कार्याचा गौरव झाल्याने नवे बळ, नवी उर्जा, उत्साह आणि उमेद वाढते. यातूनच आम्ही कलाकार नागरिकांना तणावमुक्त ठेवण्यासाठी प्रोत्साहित होतो.
डॉ. आशुतोष जातेगावकर म्हणाले, कोथरूडरत्न पुरस्काराने सन्मानित झाल्याने भविष्यातील जबाबदारीची जाणीव झाली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
प्रा. जयराम जोशी यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. प्राचीन ललित कला प्रबोधिनीच्या महिला सदस्यांनी ईशस्तवन तर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदिश शिरापूरकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. आशुतोष जातेगावकर यांचे बासरीवादन तर अद्वैत अभ्यंकर यांचे एकल तबलावादन झाले.
फोटो मध्ये : प्राचीन ललित कला प्रबोधिनी, पुणे आणि समस्त ब्राह्मण सेवा संस्था, कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने ऋषी पंचमीनिमित्त ऋषीतुल्य व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. विवेक सिन्नरकर, श्याम पोरे, बाळकृष्ण वाडेकर, किशोरी जानोरीकर, विश्वास पटवर्धन यांच्यासमवेत मान्यवर.