मनपा शाळेत प्राथमिक शिक्षण झाल्याने त्याची जाणीव
शिक्षक दिनानिमित्त मनपा शाळेतील शिक्षकांचा गौरव
पुणे-माझी जडणघडण ही मुंबईतील मनपा शाळेत झाल्याने; मनपा शाळेतील शिक्षक अतिशय खडतर परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञान दानाचे काम करतात. त्यामुळे त्याची जाणीव मला आहे, अशा शब्दांत नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मनपा शाळेतील शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करत; आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
शिक्षक दिनानिमित्त नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पुणे महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजिका माजी नगरसेविका तथा शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, माजी नगरसेविका हर्षाली माथवड, ॲड. मिताली सावळेकर, सरचिटणीस दिनेश माथवड,कुलदीप सावळेकर,दीपक पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, माझे आणि माझ्या बहिणींचे प्राथमिक शिक्षण हे मुंबईतील महापालिकेच्या शाळेत झाले. त्यामुळे आजही तो काळ आठवला की, सर्वात पहिला चेहरा समोर येतो तो शिक्षकांचा! कारण, अपुऱ्या सुविधा असूनही; त्यावर मात करत ते विद्यार्थ्यांना ज्ञान दानाचे पवित्र कार्य करायचे. त्यामुळे मनपा शाळेतील शिक्षकांचे महत्व आणि त्यांच्या मेहनतीची जाणीव आहे, अशी भावना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, आजही गुरुंचे स्थान प्रत्येक व्यक्तीच्या मनात कायम आहे. त्यामुळे शिक्षक हे आजही वंदनीयच आहेत. मनपा शाळेतील शिक्षक अतिशय खडतर परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यामुळे कोथरूड मतदारसंघातील मनपा शाळेतील सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही यावेळी दिली.
शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना, शिक्षण मंडळ शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी खर्डेकर यांनी केले तर हर्षाली माथवड यांनी आभार प्रदर्शन केले.