पुणे, दि. 6: बांधकाम व घरेलू कामगारांना अनुक्रमे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचे लाभ देण्याबाबत दलाल, त्रयस्थ व्यक्तीमार्फत आमिष दाखविण्यात येत असून त्याला कामगारांनी बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
मंडळात नोंदणी करण्याचे आणि त्याअंतर्गत घरेलू व बांधकाम कामगारांना लाभ देण्याचे आमिष दाखवून कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांच्या नावाखाली पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. कामगारांनी कोणत्याही दलाल, संघटना अथवा त्रयस्थ व्यक्ती यांच्या आमिषाला व दबावाला बळी पडू नये; त्यांच्याशी कोणतेही आर्थिक व्यवहार करु नये. अशा व्यक्तींकडून नोंदणी, नूतनीकरण व लाभासाठी पैशाची मागणी केल्यास त्यांच्या विरोधात जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभवाटपाचे कामकाज https://www.mahabocw.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन प्रणालीद्वारेच करण्यात येते. मंडळाने जाहीर केलेल्या विविध योजनांच्या लाभाचे वाटप डीबीटी पद्धतीने करण्यात येते. तसेच सुरक्षा व अत्यावश्यक संच (पेटीवाटप), गृहपयोगी संच (भांडी वाटप) आदीचे वितरण नियुक्त एजन्सीमार्फत करण्यात येते. या लाभासाठी कोणतेही शुल्क वेगळे आकारण्यात येत नाही.
बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण यासाठी केवळ १ रुपये शुल्क आकारण्यात येते. बांधकाम कामगारांचे नोंदणी ओळखपत्र मंडळाच्या कार्यालयातूनच वाटप करण्यात येते. घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत कामगारांची नोंदणी शुल्क १ रुपये तसेच अंशदान शुल्क दरमहा १ रुपये याप्रमाणे वार्षिक १२ रुपये आहे, अशीही माहिती कामगार उप आयुक्त अभय गिते यांनी दिली आहे.
0000