ऐतिहासिक पेशवा घराण्याचे ९ वे वंशज डॉ.उदयसिंह पेशवा यांना पुणेकरांकडून श्रद्धांजली अर्पणश्री देवदेवेश्वर संस्थान, पर्वती व कोथरूड पुणे यांच्या वतीने आयोजन : विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
पुणे : ऐतिहासिक पेशवा घराण्याचे वंशज डॉ.उदयसिंह पेशवा हे ज्ञानाने आणि कर्तृत्वाने मोठे होते. पेशवे घराण्याचा अहंभाव त्यांनी कधीही बाळगले नाही. पेशवे घराण्याचे कर्तृत्व त्यांनी सातत्याने समाजासमोर आणण्याचे काम केले. पर्वतीवर त्यांचे विशेष प्रेम होते त्यामुळे तेथे त्यांनी वृक्षारोपण करून त्याची जोपासनाही केली. डॉ. उदयसिंह पेशवा म्हणजे देवदेवेश्वर संस्थानाचा चालता बोलता इतिहासच होते त्यांच्या निधनाने संस्थानाच्या गतकाळातील एक पर्व संपले आहे. अशी भावना व्यक्त करत पुणेकरांनी पेशवे घराण्याचे ९ वे वंशज डॉ. उदयसिंह पेशवा यांना श्रद्धांजली अर्पण केली.
श्री देवदेवेश्वर संस्थान, पर्वती व कोथरूड पुणे यांच्या वतीने संस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त उदयसिंह पेशवा यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सारसबाग गणपती मंदिर प्रांगणात ही शोकसभा झाली. यावेळी श्री देवदेवेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, विश्वस्त जगन्नाथ लडकत, सुधीर पंडित, आशिष कुलकर्णी उपस्थित होते. एअर मार्शल (नि.) भूषण गोखले, इतिहास अभ्यासक मंदार लवाटे, त्र्यंबकेश्वरचे डॉ. सत्यप्रिय शुक्ला, इतिहास अभ्यासक गुरुप्रसाद कानिटकर, इतिहास संशोधक राज मेमाणे, कुमार खांडकेकर गुरुजी, आरती मंडळाचे अवधूत पानसे, ब्राह्मण महासंघाच्या विद्या घटवाई, मंजिरी जोशी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
गो. बं. देगलूरकर म्हणाले, उदयसिंह पेशवा हे मोठ्या घराण्यातले वंशज असले तरीही अगदी शांतपणे ते लोकांना मार्गदर्शन करत. त्यांच्यामध्ये ज्ञान प्राप्त करण्याची उत्सुकता होती. मला त्यांचा स्नेह मिळाला याचा अभिमान वाटतो. पेशवे घराण्याचे महत्त्व त्यांनी टिकवून ठेवले.
मोहन शेटे म्हणाले, पंधरा-वीस वर्षांपूर्वी शनिवारवाड्यावर जे कार्यक्रम होत असत त्याला अगदी मुठभर माणसे येत होती. ज्यांनी साम्राज्य निर्माण केले त्यांच्या कार्यक्रमाला लोकांची उपस्थिती अगदीच नगण्य असे परंतु उदयसिंह पेशवा यांनी वेगवेगळ्या संस्था संघटना यांच्यापर्यंत पोहोचून जनजागृती केली. पेशवे यांनी कधीही पेशवे असल्याचे भांडवल केले नाही, मात्र त्याची प्रतिष्ठा सांभाळली.
रमेश भागवत म्हणाले, उदयसिंह पेशवा यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सारसबाग गणपती मंदिरातील मूर्ती बदलण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांचे जुन्या पिढीतील सरदारांशी देखील उत्तम संबंध होते जुन्या वतनदारांना एकत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न देखील केला होता.
जगन्नाथ लडकत म्हणाले, उदयसिंह पेशवा यांच्या जाण्याने एक आधारवड गेला आहे. ते अतिशय नम्र, चारित्र्यसंपन्न असे व्यक्तिमत्व होते.
पुष्कर सिंह पेशवा म्हणाले, उदयसिंह पेशवा यांना लोकांचे प्रेम आणि आदर मिळाला. ते भाग्यवान होते. त्यांची उणीव नेहमीच आम्हाला भासणार आहे. त्यांच्या आदर्शावर चालण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू.
*थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती सरकारी इतमामात साजरी होण्याबद्दल आशावादी –* ज्या पेशवे घराण्याच्या कर्तबगारीने अटकेपार झेंडा लागला त्या पेशव्यांच्या बद्दल सरकार दरबारी असलेली अनास्था याविषयीची खंत ते नेहमी बोलून दाखवत. तरीही कधीतरी सरकारला जाग येईल व श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती सरकार दरबारी सरकारी इतरमामात साजरी होईल याबद्दल डॉ. उदयसिंह पेशवा आशावादी होते. अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.