पुणे, दि. ६: खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांकडून प्रति कि.मी. भाडे दराच्या ५० टक्के पेक्षा अधिक किंवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या भाडेदराच्या दीडपटीपेक्षा अधिक भाडेदर आकारणी केली गेल्यास rtopune@gmail.com या ई-मेलवर किंवा ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे.
खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांना जादा भाडे आकारण्याच्या प्रवृतीला आळा घालण्यासाठी व रस्ता सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने ३० सप्टेंबरपर्यंत तपासणी व मनमानी भाडे आकारणीबाबत मोहीम राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या टप्पा वाहतूकीचे भाडेदर विचारात घेवून खासगी बसचे त्या संवर्गासाठीचे कमाल भाडे परिवहन महामंडळाच्या बसेसच्या भाडेदराच्या दीडपटीपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजी शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत.
शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स, बसेस यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. खासगी बस मालक चालक यांनी नियमानुसार प्रवासी तिकीटदराची आकारणी करावी, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळविले आहे.