पुणे : ज्या गुन्हेगारांनी आपली घरे बेकायदा पद्धतीने उभारली असतील, तर त्यांच्यावर आता बुलडोझर चालविला जाणार आहे. पुणे पोलिसांनी याबाबत माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. नियमांच्या चौकटीत राहून हे काम करण्यात येणार आहे.तुम्ही बदमाश असाल तर पोलिसदेखील शरीफ नाहीत, हे आम्ही दाखवून देऊ, असा इशाराच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांना दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनानंतर शहरातील वाढती गुन्हेगारी आणि टोळ्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. कौटुंबिक मालमत्तेचा वाद हे जरी वनराज यांच्या खुनामागे एक कारण असले तरी, टोळीयुद्धाच्या संघर्षाची मोठी किनार या प्रकरणाला आहे. निखिल आखाडे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाड टोळीने वनराज यांचा काटा काढला. वनराजच्या खुनात सहभागी असलेल्या प्रमुख आरोपींचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी या गुन्हेगारांना चांगलीच अद्दल घडविण्यासाठी त्यांच्या बेकायदा घरावर बुलडोझर फिरविण्याची तयारी केली आहे.
पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या बेकायदा घरांची, मालमत्तेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये काही आरोपी फ्लॅटमध्ये राहत आहेत, तर काही आरोपींची घरे भाड्याची आहेत. त्यांची घरे तपासली जात आहेत. त्यामध्ये जर ही घरे सरकारी जागेत अतिक्रमण करून उभारली असतील, कोणाच्या मालमत्तेत अवैध ताबा मारून बांधली असती तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी पंधरा जणांना अटक केली असून, तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आणखी काही संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांना लवकरच पोलिस अटक करतील, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशात सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी योगी सरकारकडून त्यांच्या घरावर बुलडोझर चालविला जातो. पुणे पोलिसदेखील आता योगी पॅटर्न वापरणार असल्याचे यावरून दिसून येत आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपींच्या संपर्कात असलेल्या लोकांची पोलिस माहिती घेत आहेत. पोलिसांच्या हाती ठोस माहितीदेखील लागली आहे. वनराज यांचा खून केल्यानंतर, किंवा खुनाच्या पूर्वी प्रमुख आरोपींच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती पोलिसांच्या रडारवर आहेत. आरोपींना पैसे पुरवणे त्यांना पळून जाण्यास मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांना या गुन्ह्यात आरोपी केले जाणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे.
सोमनाथ गायकवाड टोळीतील सदस्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड पाहता, पोलिसांकडून लवकरच त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुन्हेगारांनी त्यांची घरे जर बेकायदा पद्धतीने उभारली असतील तर, त्या घरांवर बुलडोझर चालणार आहे. पोलिसांनी याबाबत माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. नियमांच्या चौकटीत राहूनच हे काम करण्यात येणार आहे. गुन्हेगार बदमाश असतील तर पोलिस शरीफ नाही आहेत, हे आम्ही नक्की दाखवून देणार. – अमितेश कुमार, पोलिस आयुक्त