राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेचे ‘एमआयटी एडीटी’त यशस्वी आयोजन
पुणेः पुणे जिल्हा कबड्डी संघटना व विद्यार्थी कल्याण विभाग एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत बीजेएस वाघोली महाविद्यालयाने १८ गुणांनी बाजी मारली. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्याने एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत बीजेएस वाघोली संघाने मराठवाडा मित्र मंडळ इंजिनिअरींग महाविद्यालयाचा (एमएमसीओई) ५५-३७ अशा दणदणीत फरकाने पराभव केला. बीजेएस वाघोलीच्या यशात हर्षल दौधार व दर्शन रणदिवे या खेळाडूंनी जोरदार आक्रमणांसह संघाच्या गुणांत भर घातली. तर दुसरीकडे, एमएमसीओईकडून ऋषीकेश सोनवणे याने बहारदार कामगिरी केली खरी, परंतू तो संघाला विजयापर्यंत पोहोचू शकला नाही. पहिल्या सत्रात बीजेएस वाघोलीने २ लोण व २ बोनससह एकूण २२ गुणांची कमाई केली. दुसरीकडे, एमएमसीओईने देखील चांगली झुंज देताना १९ गुण मिळविले. मात्र, सामन्याच्या दुसऱ्या सत्रात, बीजेएस वाघोलीच्या खेळाडूंनी केलेल्या आक्रमणासमोर एमएमसीओईच्या खेळाडूंची पुरती धांदल उडाली. या निर्णायक सत्रात बीजेएसने तब्बल ३३ गुणांची लयलूट केली, तर एमएमसीओई केवळ १८ गुण मिळवता आले. ज्यामुळे, १८ गुणांच्या फरकासह बिजेएस वाघोलीला विजेतेपदाचा मान मिळाला.विजेत्या संघाला, माजी कबड्डीपटू आप्पासाहेब दळवी, क्रीडा विभाग संचालक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा.पद्माकर फड, आशियाई रोइंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारे प्रा.आदित्य केदारी, विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डाॅ.सुराज भोयार, ऑलिंपियन बॉक्सर मनोज पिंगळे यांच्या हस्ते करंडक, रोख रक्कम अशा स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेसाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कबड्डी प्रशिक्षक क्षिप्रा पैठणकर यांनी विशेष मेहनत घेतली.