पुणे :ज्ञान प्रबोधिनी नेतृत्व संवर्धन केंद्राचा ‘अग्रदूत प्रकल्प’सुरु झाला असून त्याअंतर्गत आयोजित आव्हानात्मक व्यक्तीकार्य स्पर्धाना चांगला प्रतिसाद मिळाला .युवक, युवतींमधल्या नेतृत्वाच्या क्षमता आणि इच्छाशक्ती शोधण्यासाठी सुरू झालेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील स्पर्धा पुणे आणि पिंपरी-चिंचवड केंद्रांमध्ये पार पडल्या. ५८ युवक, युवतींनी आयत्या वेळी मिळालेली व्यक्तीकार्ये पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड, नवनवीन मार्ग वापरून लोकसहभाग मिळवण्याचा उत्साह हे स्पर्धेचे वैशिष्ट्य होते.
आधी न केलेल्या प्रकारचे काम अनोळखी वातावरणात करण्याचे आव्हान हे व्यक्तीकार्य प्रकारात विद्यार्थ्यांना दिले जाते .कोणत्याही परिस्थिती यशस्वी वाटचाल करण्यासाठी नेतृत्व संवर्धनास अशा प्रकारचे व्यक्तीकार्य उपयोगी येते. काम पूर्ण केलेल्या ३९ जणांची पुढच्या फेरीसाठी निवड झाली .व्यक्तीकार्यांबरोबरच प्रबोधिनीची ओळख, कामांचे आढावा लेखन, गटांमध्ये अनुभवकथन आणि प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यांबद्दल माहिती असे दिवसभराचे वेळापत्रक होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही केंद्रांवरील १५ स्वयंसेवक आयोजनात सहभागी होते. अशीच स्पर्धा सप्टेंबर महिन्यात बारामती आणि शिरूर येथे होणार आहे. २ ऑक्टोबरला कार्यशाळा होणार आहे. नाव नोंदणी सुरू झाली असून सहभागी होण्यासाठी 9579686602 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
युवक,युवतींमधील नेतृत्व विकास करून समाज परिवर्तनाचे अग्रदूत करण्यासाठी हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.या प्रकल्पात वर्षभर स्पर्धा,शिबिर,सामाजिक प्रकल्प,इंटर्नशिप,अभ्यास सहल आणि मेंटरींग चा समावेश आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र,पारितोषिके ,शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील ६ तालुके ,पुणे,पिंपरी -चिंचवड ही दोन शहरे या ठिकाणी प्रकल्पाचे उपक्रम होणार आहेत.वय वर्षे १८ ते २४ वयोगटातील युवक-युवतींसाठी हा उपक्रम आहे. अशी माहिती ज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह महेंद्र सेठीया ,प्रकल्प प्रमुख डॉ. सौगंध देशमुख यांनी दिली