पुणे / पिंपरी (दि. ३०) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून सोमाटणे व तळेगाव (ता. मावळ) येथील अनधिकृत पब, बार अँड रेस्टॉरंट यासह अनधिकृत होर्डीगवर गुरुवारी सकाळी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. पीएमआरडीएच्या हद्दीतील सर्व पब, बार व रेस्टॉरंट्स यांचा सर्व्हे चालू असून अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई यापुढे पण चालू राहील, असे उपजिल्हाधिकरी डॉ. दीप्ती सूर्यवंशी स्पष्ट यांनी केले.
या कारवाईत हॉटेल काव्या बार अँड रेस्टो या हॉटेलचे परवानगी व्यतिरिक्त वाढीव बांधकाम पीएमआरडीएने काढत या पुढे अनधिकृत बांधकाम करणार नसल्याचे जबाबद्वारे नोंदवण्यात आले. हॉटेल आदित्य बार हॉटेलवर कारवाईसाठी गेले असता स्थानिक प्रतिनिधी यांनी पीएमआरडीएने संबंधित व्यावसायिकांना हॉटेल अधिकृत करण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती केली. हॉटेल व्यावसायिक स्वतः अनधिकृत बांधकाम काढून घेण्याच्या अथवा परवानगी घेण्याच्या जबाबावर तेथील कारवाई पुढे ढकलण्यात आली. परंतु जबाबमधील मुदत न पाळल्यास त्यावर कारवाई अटळ असल्याचे बांधकामधारकास स्पष्ट करण्यात आले. यासह हॉटेल मयुर गार्डन अँड बार व भजनसिंग ढाब्याचे परवानगी व्यतिरिक्त वाढीव बांधकामाचे निष्कासन करण्यात आले.
यात तीन अनधिकृत होर्डिंगवर कारवाई प्रस्तावित होती. यादरम्यान २ होर्डिंगधारकांनी स्वतःचे होर्डींग काढून घेतले तर उर्वरीत एका अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीएकडून निष्कासनाची करत ते जप्त करण्यात आले. गुरुवारच्या कारवाईत साधारणपणे ५८४०.०० चौ.फूट. क्षेत्रावरील अनधिकृत हॉटेल, पब, रेस्टॉरंट व बार हे पोकलेन, जेसीबी व मनुष्यबळाच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. यादरम्यान पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागातील उपस्थित अधिकारी यांचेमार्फत सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन करण्यात आले. संबंधित कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलीस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी – पाटील, तहसीलदार सचिन मस्के, तहसीलदार राजेंद्र रांजणे, पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे, कनिष्ठ अभियंता गणेश जाधव, अभिनव लोढें तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.