मुंबई-छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दु:खदायक घटना आहे. यावर कोणीही राजकारण करु नये. पुतळा उभारताना राजकोट किल्ल्यावरील वाऱ्यांचे आकलन शिल्पकाराला करता आले नसावे. आता आम्ही नौदलाच्या मदतीने त्याच ठिकाणी नवा पुतळा उभारू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, दुर्घटनेनंतर पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही, असा निशाणा फडणवीस यांनी विरोधकांवर केला. अफझलखानासारख्या कितीही प्रवृत्ती चालून आल्या तरी आम्ही लोकशाही पद्धतीने त्यांचा कोथळा बाहेर काढू. जे श्रीकृष्णाला मानतात तेच 2024 विधानसभेची हंडी फोडणार. महाविकास आघाडीचे थर बिथरले आहेत.
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. पंतप्रधान मोदी यांनी 8 महिन्यापूर्वी नौदल दिनाच्या कार्यक्रमात शिवरायांच्या या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यामुळे या पुतळ्याच्या बांधकामावरुन सरकारला कोंडीत पकडण्याचे काम विरोधकांनी केले. या पुतळा राज्य सरकारने उभारला नसल्याचे स्पष्टोक्ती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली. परंतु विरोधकांनी सरकारला टारगेट करणे काही सोडले नाही. दरम्यान आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
राजकोट किल्ल्यावरती कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मंगळवारी सकाळी पंचनामा सुरू करण्यात आला. पोलिस यंत्रणा आणि फॉरेन्सिक एक्सपोर्टच्या माध्यमातून हा पंचनामा करण्यात आला. साधारण दीड तासाने नौदलाचे दोन अधिकारी याठिकाणावरुन पाहणी करुन बाहेर पडले. त्यानंतरही सिंधुदुर्गातील फॉरेन्सिक डिपार्टमेंटमधील तज्ञांकडून पंचनामा सुरू होता. आत गेलेल्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून स्मारकाच्या ठिकाणचे मोजमाप आणि इतर बाबींची नोंद घेतली गेली.फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सांगितले की, घटनास्थळावरून पुतळ्याचे अवशेष आम्ही जमा केलेले आहेत. ते आता पुढे पाठवले जातील आणि त्यानंतर त्याबाबतचा अहवाल येईल. हा अहवाल येण्यास किती दिवस लागतील? हे मात्र आम्ही सांगू शकत नसल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना फॉरेन्सिक तज्ञांनी दिली.
छत्रपती संभाजी राजेंनी उद्घाटनाचा फोटो , त्यांचे पत्र आणि पुतळा कोसळल्यावर चौथऱ्याचा फोटो देऊन प्रतिक्रिया समाज माध्यमातून व्यक्त केली होती.