बेजबाबदार व निष्क्रीय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा.
बदलापुर प्रकरणातील शाळेतील सर्वांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करा.
मुंबई, दि. २२ ऑगस्ट २०२४
राज्याला एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असूनही ते महिलांना न्याय देऊ शकत नाहीत. राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे, यातून लहान मुलीही सुटलेल्या नाहीत. गुन्हेगारांवरच अंकुश राहिला नसल्याने राज्यातील परिस्थीती बिकट बनली आहे. महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी केली आहे.
टिळक भवनमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना संध्या सव्वालाखे यांनी महायुती सरकारवर तोफ डागली. त्या पुढे म्हणाल्या की, बदलापूरमध्ये तीन, साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचाराच्या घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे. गुन्हा नोंदवण्यासाठी पीडित मुलीच्या आईला पोलीस स्टेशनमध्ये १२ तास बसवून ठेवले, पोलिस दबावाखाली होते असे स्पष्ट दिसते. ज्या शाळेत हा गुन्हा घडला त्या शाळेतील संबंधित लोकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा. घटना १२ तारखेला घडली व १५ तारखेला मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी बदलापुरात होते पण त्यांच्यापर्यंत ही माहिती का पोहचली नाही. राज्यातील महिला अत्याचाराच्या एका घटनेत तपास करून दोन महिन्यात आरोपीला फाशी दिली, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी काल एका कार्यक्रमात सांगितले. ही घटना कोणती व कोणाला फाशी दिली त्याचा खुलासा करावा व बदलापूरच्या नराधमालाही तातडीने फाशी द्यावी, असेही सव्वालाखे म्हणाल्या.
महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूरमध्ये झालेल्या लहान मुलींवरील अत्याचाराची माहिती घेतली व पोलीस स्टेशनला भेटून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केल्याची माहिती सव्वासाखे यांनी दिली. बदलापूरच्या घटनेने देश हादरला पण राज्य महिला आयोगाने तीन-चार दिवस या घटनेची दखलही घेतली नाही, त्या कुठे होत्या. हे काम बाल हक्क आयोगाचे आहे माझे नाही, असे उद्धट उत्तर त्यांनी दिले, अशा बेजबाबदार व निष्क्रीय व्यक्तीने पदाचा राजीनामा द्यावा. भाजपाच्या चित्रा वाघ यांनीही बदलापूरच्या लहान मुलीबद्दल एक शब्दही काढला नाही उलट कोलकात्याच्या घटनेवर त्या बोलत आहेत. बदलापूरच्या माजी नगराध्यक्षाने एका महिला पत्रकाराला अश्लील भाषा वापरली, या महिला पत्रकाराचा दोन दिवस गुन्हा नोंद करुन घेतला नाही, या माजी नगराध्यक्षला अटक करा अशी मागणीही सव्वालाखे यांनी केली.
बदलापूरसारख्याच घटना अकोला, नाशिक, ठाणे जिल्ह्यात घडल्या आहेत. राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना व निष्क्रीय सरकार लक्षात घेऊन प्रदेश महिला काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात नारी न्याय समिती स्थापन करणार आहे. या समितीत एक महिला वकील व पाच महिला सदस्य असतील, पीडित महिलांना सर्व प्रकारची मदत तसेच समुपदेशन करण्याचे काम ही समिती करेल, अशी माहिती संध्या सव्वालाखे यांनी दिली आहे.