MPSC मधील अधिकारी मग्रुर, कृषी संवर्गाच्या २५८ जागांचे नोटीफेकशन काढा, विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ का यावी?
महायुती सरकारचा पायाच भ्रष्ट, मंत्रालय टक्केवारी कमावण्याचे केंद्र बनले: बाळासाहेब थोरात.
विधानसभा निवडणुकीच्या तयाराची उत्तर महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक नंदूरबारमध्ये संपन्न.
नंदूरबार/ मुंबई, दि. २२ ऑगस्ट
महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. कर्नाटकतील भाजपा सरकार ४० टक्के कमीशनवाले होते महायुती सरकार तर त्यापुढे गेले आहे, भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रमच या सरकारने रचले आहेत. महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज लादून महागाई वाढवली आहे, महाराष्ट्र हे सर्वात महागडे राज्य अशी ओळख निर्माण झाली आहे. महायुती सरकार गुजरातधार्जिणे असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग आणायचे व राज्यातले उद्योग गुजरातला पाठवायचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीसमोर व गुजरात लॉबीसमोर झुकणारे भाजपा युती सरकार उखडून फेका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
उत्तर महाराष्ट्र विभागातील नंदरूबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील आढावा बैठक नंदूरबारमध्ये पार पडली या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्यध्यक्ष आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री के. सी. पाडवी, खासदार गोवाल पाडवी, खासदार शोभा बच्छाव,प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, आ. शिरीष नाईक, आमदार शिरीष चौधरी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, बदलापूरमध्ये ३ वर्षांच्या दोन मुलींवर एका नराधमाने अत्याचार केल्यामुळे जनतेत तीव्र संताप आहे. सरकार कारवाई करत नसल्याने हजारो लोक रस्त्यावर उतरले पण महायुती सरकारला यात राजकारण दिसत आहे. ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा भाजपाशी संबंधित आहे, त्या शाळेला वाचवण्याचा प्रयत्न झाला. शाळेने सीसीटीव्ही फुटेज गायब केले, १२ तारखेला ही घटना घडली आणि १५ तारखेला मुख्यमंत्री बदलापुरात होते त्यांनी त्या घटनेकडे लक्ष दिले नाही. पीडित मुलीच्या गर्भवती आईला १२ तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. सामाजिक संस्थांच्या आणि नागरिकांच्या दबावामुळे गुन्हा दाखल करावा लागला. बदलापूर, अकोला, लातूर, नागपूरमध्येही असेच प्रकार घडले त्यामुळे संतप्त महिलांनी १५०० रुपये नको, मुलींना संरक्षण द्या, अशी मागणी केली, यात राजकारण कसे दिसते, असा सवाल पटोले यांनी केला.
बदलापूरच्या वरिष्ठ पीआय महिला असतानाही त्यांनी पीडित मुलीच्या आईला १२ तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले, त्यांच्यावर सरकारचा दबाव होता हे स्पष्ट आहे. सरकार आपले पाप लवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या आयपीएस अधिकाऱ्याची एसआयटी नेमली त्यांची कामगिरी संशयास्पद आहे आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे तर भाजपाचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे या दोघांना बदलावे अशी आमची मागणी आहे असे पटोले म्हणाले.
केंद्रीय बोर्ड किंवा युपीएससीच्या परीक्षा असताना राज्य आयोग परीक्षा ठेवत नाही पण यावेळी त्या एकत्र ठेवल्या असल्याने एमपीएससीच्या परिक्षांची तारीख बदलावी तसेच कृषी संवर्गाच्या २५८ जागांचे नोटीफिकेशन काढावे यासाठी पुण्यात विद्यार्थी दोन दिवसांपासून आंदोलन करत आहेत पण एमपीएससी विद्यार्थ्यांचे ऐकत नाही. आयोगातील अधिकारी मग्रुर आहेत, विद्यार्थ्यांच्या भवितव्यशी ते खेळत आहेत. ग्रामीण भागातील लाखो गरिब विद्यार्थी अधिकारी होऊ पहात आहेत पण त्यांच्या स्वप्नावर एमपीएससी पाणी फेरत आहे. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करण्याची विनंती केली असे नाना पटोले म्हणाले.
आढावा बैठकीत बोलताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, महायुती सरकारचा पायाच भ्रष्ट आहे, ५० खोके एकदम ओके, हे आजही लोक विसरले नाहीत. मंत्रालय हे आता टक्केवारीचे केंद्र झाले आहे, फक्त पैसे कमावण्याचे काम सुरु आहे. अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, चार चार महिने पगार होत नाहीत आणि लाडकी बहिण योजनेच्या प्रचारावर सरकार ४०० कोटी रुपयांची उधळपट्टी करत आहे. भ्रष्ट महायुती सरकारपासून महाराष्ट्र वाचवायचा आहे हे लक्षात ठेवून विधानसभेला काम करा व महाविकास आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन थोरात यांनी केले.
प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यावेळी म्हणाले की, खान्देशच्या जनतेने काँग्रेस पक्षाला नेहमीच साथ दिली आहे. खान्देशच्या रक्तातच काँग्रेस आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी नंदूरबारमधूनच प्रचाराचा नारळ फोडत. प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधान सभेसाठी काम करू व सरकार स्थापनेसाठी खान्देशातून मोठी ताकद देऊ असे कुणाल पाटील म्हणाले.
माजी मंत्री के. सी. पाडवी म्हणाले की, लोकशाही व राज्यघटना जिवंत ठेवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत आहेत. लोकसभेला काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे आता महाराष्ट्रात सरकार आले की दिल्लीतील सरकारही पडेल. २०१८ पासून केंद्रातील अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या थेट भरतीतून केल्या जात होत्या व त्यामध्ये आरएसएस व भाजपाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात होती, काँग्रेस इंडिया आघाडीने त्याला विरोध करताच एनडीए सरकारला यावेळी माघार घ्यावी लागली व ही प्रक्रिया रद्द करावी लागली. खान्देशातून विधानसभेला काँग्रेस मविआच्या जास्तीत जास्त जागा जिंकूण देऊ असा विश्वास पाडनी यांनी व्यक्त केला.
खा. शोभाताई बच्छाव, खा. गोपाल पाडवी, आ. शिरीष दादा चौधरी, यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आ. शिरीष नाईक यांना आभार प्रदर्शन केले.