पुणे, २२ ऑगस्ट २०२४: जन्मानंतर लगेचच चिकुनगुन्या (CHIKV) संसर्गामुळे शरीरात गंभीर गुंतागुंत झालेल्या नवजात अर्भकावर यशस्वी जीवनरक्षक उपचार केल्याचे सांगताना सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी विभागाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे. या केसमधून नवजात अर्भकांमध्ये डासांमुळे होणारे आजार किती गंभीर ठरू शकतात यावर प्रकाश टाकला जात आहे. विशेषत: हवा बदलत असतानाच्या संक्रमण काळात अशा प्रकारचे संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आढळते.
सुरुवातीला नवजात बाळाची प्रकृती चांगली होती आणि सामान्य प्रसूतीनंतर तीन दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला. परंतु अवघ्या सहा दिवसांनंतर, बाळाला पुन्हा सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरीच्या नगर रस्त्यावरील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी बाळाच्या प्रकृतीतील लक्षणे चिंताजनक आणि गोंधळात टाकणारी होती. बाळाला खूप ताप आला होता, आहार घेतला जात नव्हता, बाळाची हालचाल कमी होत होती आणि शरीरावर दिसून येईल एवढे पुरळ उठले होते. पुण्यात अलीकडे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ पाहता वैद्यकीय पथकाला सुरुवातीला बाळाला डेंग्यू झाल्याची शंका आली. तथापि, आवश्यक चाचण्या केल्यानंतर, डेंग्यू नसल्याचे कळले आणि वैद्यकीय पथक इतर संभाव्य कारणांचा शोध घ्यायला लागले.
नवजात बाळाला पुन्हा अॅडमिट केल्यानंतरच्या तिसऱ्या दिवशी बाळाची शुद्ध हरपायला लागल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर बनली. नवजात बाळाची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी अँटीकॉनव्हलसंट औषधे सुरू करून वैद्यकीय पथकाने ताबडतोब उपचार केले. एक EEG घेण्यात आला. त्यातून निश्चेष्टतेची स्थिती असण्याला पुष्टी मिळाली. यामुळे परिस्थितीचे गांभीर्य आणखी वाढले. मूळ कारण समजून घेण्यासाठी, लंबर पंक्चर चाचणी करण्यात आली आणि एक एमआरआय घेण्यात आला. त्या दोन्ही मधून मेंदूला झालेल्या संसर्गाची लक्षणे दिसून आली. त्याचवेळी बाळाच्या प्लेटलेटची संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊ लागली. त्यामुळे डॉक्टरांनी सर्वसमावेशक उष्णकटिबंधीय ताप पॅनेल चाचणी घेतली आणि या चाचणीने शेवटी चिकुनगुन्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.
निदानाची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आणि जन्मापासून असलेला संसर्ग (बाळाच्या जन्मादरम्यान आईकडून बाळाला संक्रमण) तपासण्यासाठी वैद्यकीय पथकाने आईच्या अॅंटीबॉडीजची देखील चाचणी केली. परंतु चाचणी निगेटिव्ह होती. त्यामुळे जन्मानंतरच बाळाला संसर्ग झाल्याची खात्री झाली. त्यातून या केसची जटिलता आणखी वाढली.
चिकुनगुन्या संसर्गामुळे या नवजात शिशूमध्ये गंभीर गुंतागुंत निर्माण झाली. त्यामध्ये यकृताचे कार्य बिघडणे, रक्त गोठण्याच्या आणि श्वासोच्छवासाच्या समस्या दिसून आल्या. श्वासोच्छवासाच्या त्रासावर उपचार म्हणून बाळाला रेस्पिरेटरी (श्वासोच्छवासाच्या) सपोर्टवर ठेवण्यात आले. आणि संपूर्ण शरीरात पसरलेली जळजळ कमी करण्यासाठी इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन देण्यात आले होते. सह्याद्रि येथील वैद्यकीय पथक बाळाच्या प्रकृतीवर बारकाईने काळजीपूर्वक लक्ष ठेऊन होते. उद्भवलेल्या विविध गुंतागुंतांना सामोरे जाण्यासाठी आवश्यकतेनुसार उपचार केले जात होते.
अतिदक्षता विभागात (ICU) १७ दिवस राहिल्यानंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. यकृताचे कार्य सामान्य होण्यास सुरुवात झाली, प्लेटलेटची संख्या स्थिर झाली आणि नवजात बाळाचे एकूण आरोग्य सुधारू लागले. सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी येथील वैद्यकीय पथकाचे अथक प्रयत्न आणि तज्ञ डॉक्टरांचे कौशल्य यामुळे बाळाची तब्येत बरी झाली. डॉ. प्रदीप सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. प्रीती लाड, डॉ. प्रतीक कटारिया, डॉ. निकिता मानकर, डॉ. सुश्मिता आणि डॉ. दिनेश ठाकरे यांचा या वैद्यकीय पथकात समावेश होता. बाळाची तब्बेत सुधारल्यानंतर बाळाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी येथील निओनॅटॉलॉजी आणि पेडियाट्रिक्स विभागाचे संचालक आणि विभागप्रमुख डॉ. प्रदीप सुर्यवंशी यांनी या उपचारांबद्दल दिलासा आणि समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “नवजात बाळांमध्ये सर्वसमावेशक आणि वेळेवर निदान होणे किती गरजेचे असते हे या केसमधून खरोखरच अधोरेखित होते. बाळाच्या प्रकृतीत दिसणाऱ्या विविध प्रकारच्या लक्षणांमुळे चिकुनगुन्या संसर्ग ओळखण्यासाठी कसून आणि पद्धतशीर तपासणी दृष्टीकोन आवश्यक होता. सतत बदलत्या परिस्थितीला त्वरीत प्रतिसाद देण्याची आमच्या टीमची क्षमता आणि बाळाची प्रकृती सुधारण्यासाठी गुंतागुंत व्यवस्थापित करणे महत्वाचे होते. एवढ्या आव्हानात्मक अवस्थेनंतर बाळाची तब्बेत सुधारून बाळ सुखरूपपणे डिस्चार्ज घेऊन बाहेर पडणे ही अतिशय दिलासा देणारी समाधानकारक गोष्ट होती.”
सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी विभाग नवजात बालके आणि आपल्या सर्व रुग्णांसाठी उच्च-गुणवत्तेची, विशेष काळजी घेण्याच्या बांधिलकीबाबत ठाम आहे. कौशल्य, प्रेम आणि काळजी यासह सर्वात जटिल वैद्यकीय आव्हानांचा सामना करण्यामधील रुग्णालयाची समर्पित भावना या केसमधून दिसून येते.