सैनिक मित्र परिवार सह सहयोगी संस्थांतर्फे खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात अनोखे रक्षाबंधन
पुणे : भाऊ-बहिणीच्या अनोख्या नात्याला सैनिकांशी रक्ताचे नाते नसलेल्या बहिणींनी चाकाच्या खुर्चीवर कायमचे बसून आयुष्याची दुसरी लढाई लढणा-या या भावांना प्रेमाने औक्षण करण्यासोबतच राखी बांधत पेढ्याचा घास भरवित राखीपौर्णिमा साजरी केली.देशाच्या सिमेवर शत्रूंच्या गोळ्यांचा सामना करण्यासाठी शस्त्र हातात घेऊन निधडया छातीने सज्ज असताना अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या पोलादी मनगटांना या राखीमुळे जगण्याकरिता प्रेमाचे बळ मिळाले.
निमित्त होते, सैनिक मित्र परिवार, दत्तात्रय फाऊंडेशन, आर्मी इन्स्टिटयूट आॅफ टेक्नॉलॉजी, भारती विद्यापीठ हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी, सुभद्रा भोसले नर्सरी स्कूल, यांसह १० सामाजिक संस्थांनी खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रांतील सैनिकांसाठी आयोजित राखी पौर्णिमा या कार्यक्रमाचे. यावेळी अपंग सैनिक पुनर्वसन केंद्राचे व्यवस्थापक कर्नल मुखर्जी, कल्याणी सराफ, गायत्री जवळगीकर, दीप्ती डोळे, विद्या शिंदे आदी उपस्थित होते.
आनंद सराफ म्हणाले, देशाच्या रक्षणार्थ लढणारे वीर जवान हे आपले भाऊ आहेत, ही भावना प्रत्येक भगिनीमध्ये रुजायला हवी. तसेच सैनिकांच्या कार्यातून मिळणारी उर्जा आपण प्रत्येकाने आत्मसात करायला हवी. अपंगत्व आल्यानंतर सैनिकांचे पुढील आयुष्य अवघड असते. त्यामुळे सैनिकांसमवेत सण उत्सव साजरे केल्याने त्यांचे मनोेबल वाढते. अपंगत्व आले तरीही प्रत्येक सैनिकामधील सकारात्मकता मोठी असते. कोणत्याही संकटाला ते धैर्याने सामोरे जातात, असेही त्यांनी सांगितले.