लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा उदंड प्रतिसाद
पुणे-स्वातंत्र्य दिनाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरुडमध्ये ‘तिरंगा सायकल रॅली’ चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत कोथरुडकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेत, पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी कोथरुड तिरंगामय झाले होते.
्देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित भारत करण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी विकसित भारताच्या अनुषंगाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड मध्ये ही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आणि शाहू लक्ष्मी क्रीडा अकादमीच्या संयोजनातून तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीत अबालवृद्ध मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. कोथरुड मधील परमहंसनगर मध्ये नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला. शिवतीर्थनगर, रामबाग कॉलनी, पौडरोड, एसएनडीटी चौक, नळस्टॉप, महादेव मंदीर, गुळवणी महाराज पथ, सीडीएसएस चौक, गणेशनगर, अलंकार पोलीस स्टेशन, अलंकार सोसायटी, गिरीजा शंकर विहार, के5टू, ममता स्वीट्स, कर्वेनगर, मावळेआळी, साईबाबा मंदिर, वनदेवी, कोथरुड बस स्टँड अशी मार्गस्थ झाली. कर्वे पुतळा येथे या रॅलीचा समारोप झाला. यावेळी भारतमाता की जय, वंदे मातरम् च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
या रॅलीत भाजप दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, संयोजिका आणि भाजप दक्षिण मंडल सरचिटणीस प्रा.डॉ.अनुराधा येडके, ओबीसी आघाडी अध्यक्ष राज तांबोळी, सरचिटणीस गिरीश खत्री, दीपक पवार, नाना कुंबरे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.