पुणे :
ज्ञान प्रबोधिनीतर्फे शालेय वयोगटासाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘निसर्गमित्र ऑलिंपियाड’ या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इंग्रजी,मराठी भाषेत होणाऱ्या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धे च्या माध्यमातून पर्यावरणाविषयी रुची उत्पन्न व्हावी हा याचा प्रमुख हेतू आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नसून दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यानुसार इयत्ता ५ वी ते ७ वी हा पहिला गट असून त्यांच्यासाठी वनस्पती व प्राणी हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. इयत्ता ८ वी ते ९ वी हा दुसरा वयोगट असून त्यांच्यासाठी पाणी, उर्जा व अन्न हे तीन विषय निश्चित करण्यात आले आहेत. या स्पर्धेत गुगल फॉर्मद्वारे सहभागी होणे अपेक्षित असून सहभागी होण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ हा असणार आहे. विनामूल्य नाव नोंदणी साठी 8956011545 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांसाठी तसेच उत्तेजनार्थ रोख स्वरुपाची बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.
स्पर्धेच्या एकूण चार फेऱ्या असणार असून त्यात बहुउत्तरी ऑनलाइन परीक्षेची पहिली प्राथमिक फेरी असणार आहे. दुसरी फेरी ही निरीक्षण कौशल्याधारित कृतीची असणार आहे. तिसरी फेरी ही प्रकल्प करणे अशी असणार आहे. चौथी फेरी ही निवडक सादरीकरणाच्या मुल्यांकनाची असणार आहे. प्रकल्प सादरीकरण हे ऑनलाइन स्वरूपात करणे अपेक्षित आहे. फेरी पार करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पात विशेष रस घेऊन काम करणाऱ्या शिक्षकांनाचीही दखल घेऊन त्यांनाही प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ नलिनीताई गुजराथी व इकॉलॉजीकल सोसायटीचे अजय फाटक हे या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक असून ज्ञान प्रबोधिनी साधन केंद्राच्या पल्लवी पराडकर या प्रमुख संयोजक आहेत. याशिवाय विविध विषयतज्ञ व्यक्तींचा या स्पर्धा आयोजनात सक्रीय सहभाग आहे. स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांसाठी तसेच उत्तेजनार्थ अशी रोख स्वरुपाची बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. स्पर्धा संयोजनासाठी मर्क्स सर्व्हिस सेंटर इंडिया या कंपनीने तर बक्षिसांसाठी ‘प्रबोध अर्थसंचय’ या वित्तसंस्थेने अर्थसाहाय्य दिले आहे.
गेल्यावर्षी या स्पर्धेत देशभरातील १२ राज्यांमधील सुमारे १८०० मुलांनी सहभाग घेतला होता. यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने सहभाग असला तरी आसाम, मणिपूर व जम्मू काश्मीर या अशांत व सीमावर्ती भागाचा शाळांचा सहभाग उल्लेखनीय होता असे पल्लवी पराडकर यांनी सांगितले. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यादृष्टीने या निसर्गमित्र स्पर्धेसाठी एका विशेष मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आलेली आहे.
स्पर्धेच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांमध्ये सर्वेक्षण व मुलाखतीच्या माध्यमातून परिसरातील पर्यावरणाशी निगडीत निरीक्षण कौशल्यांना वाव मिळणे तसेच या निरीक्षणांमधून प्रश्न पडणे व उपाय सुचणे अपेक्षित आहे. विचारांना शिस्त लागण्यासाठी मुलांना शालेय वयोगटात प्रकल्पपद्धतीचा परिचय होणे व त्यांनी ती स्पर्धेच्या निमित्ताने वापरून बघणे हेही अपेक्षित आहे. यातून शालेय मुला मुलींमधील वैज्ञानिक शोधक वृत्तीला खतपाणी मिळण्यास मदत होणार आहे. प्रकल्प सादरीकरणाचाही सराव होणार आहे. या सर्व खटाटोपातून आपल्या आजूबाजूच्या निसर्गाशी शालेय मुला-मुलींचे कुतूहलातून नाते निर्माण व्हावे हे यात अपेक्षित आहे.