पुणे ता. १८ : कथकसम्राज्ञी पं. गुरु रोहिणी भाटे यांनी स्थापित केलेल्या नृत्यभारती कथक डान्स अकॅडमीतर्फे ‘अनुबद्ध’ कथक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० व २१ तारखेला कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत ही मैफल रंगेल. संस्थेच्या जगभरातील शाखांमधील ५०हून अधिक निपुण नृत्यांगनांचा नृत्यविष्कार एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची अनोखी संधी यानिमित्ताने रसिक पुणेकरांना लाभणार आहे.
पं. गुरु रोहिणीताई भाटे म्हणजे अलौकिक व्यक्तिमत्व. पाच पिढ्यापर्यंत ज्ञानदानाची ज्योत अखंड तेवत ठेवणाऱ्या त्या एक व्रतस्थ कलाकार होत्या. म्हणूनच यंदा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ‘रोहिणीद्युति’ हा अनोखा उपक्रम संस्थेतर्फे राबविला जात आहे. या अंतर्गत ‘अनुबद्ध’ मैफल घेतली जात आहे.
स्वरचित नृत्यरचना प्रस्तुतीतून गुरुदक्षिणा अर्पण करण्याची रोहिणीताईंनी सुरू केलेली प्रथा आजही त्यांचे शिष्य अव्याहतपणे पुढे नेत आहेत. ही मैफल भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये, रोशन दात्ये, अमला शेखर, मंजिरी किरण, आभा वांबुरकर, मनीषा अभय, प्राजक्ता राज, ऋजुता सोमण आणि आसावरी पाटणकर यांच्या प्रगल्भ नृत्य संरचनेतून साकारत असून धनश्री, आभा, दीप्ती, विदुला, सिद्धी, वेणू, मयूर, अमेय, कल्याणी, अदिती, श्रुगांली या नवोदित आणि गुणी कलाकारांनी देखील या रचनांना कल्पक नृत्यरचनांची जोड दिली आहे. एकूणच ही मैफल रसिक पुणेकरांसाठी पर्वणी ठरेल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.