पुणे- राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा जोरात सुरु आहे, काही स्तरावर टीकाही होते आहे विरोधकांच्या वतीने देखील राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. आज एका मेसेजचा हवाला देत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. भावा बहिणीचे नाते एवढे स्वस्त नसते, असे म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. इतकच नाही तर बहिणींना धमकी देऊन कार्यक्रमाला बोलावले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. मात्र हिम्मत असेल तर कार्यक्रमाला न जाणाऱ्या एका तरी महिलेचा फॉर्म रद्द करून दाखवा, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आज पुण्यामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी देण्यात आली असल्याचा आरोप देखील सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मात्र, अशा पद्धतीने जर एकाही बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवा, असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी या पोस्टमध्ये सुनावले आहे.
सुप्रिया सुळे यांची केलेली पोस्ट देखील पहा…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवितात आहेत… बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार… अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, ‘बहिण-भावाचं’ नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच.