पुणे -हडपसर परिसरातील एका शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या 3 मुलींचे फाेटाे आक्षेपार्ह नग्न अवस्थेत माॅर्फ करुन साेशल मिडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी सदर मुलींच्या शाळेतील 3 दाेषी मुलांना हडपसर पाेलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विराेधात पाेलिस ठाण्यात विनयभंग, पाेक्साे कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एका पिडित मुलीच्या आईने आराेपी मुलांविराेधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार १६ वर्षीय मुलांवर गुन्हा दाखल केला गेला आहे. संबंधित मुलांनी त्यांच्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या तीन मुलींचे फाेटाे माॅर्फ करुन नग्न फाेटाे तयार केले. विधी संघर्षित मुलांनी ते फाेटाे एकमेकांना इन्स्टाग्राम या साेशल मिडिया अॅपद्वारे शेअर करुन मुलींची बदनामी हाेईल व त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केले. याबाबतची माहिती मुलींच्या कुटुंबीयांना समजल्यावर त्यांनी याप्रकरणी दाेषी मुलांचे विराेधात हडपसर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत आराेपींवर भादवि कलम ३५४ , ३५४ (ड), सह पाेक्साे कलम ८,१२, माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७, ६७ (अ), (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर तीन मुलांना पाेलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना सुरक्षेसाठी येरवडा सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांचे गुन्हयात वापरलेले माेबाईल गुन्ह्याचे कामी जप्त करण्यात आले आहे. सदर तीन मुलांना येरवड्यातील बाल न्याय मंडळात देखील हजर केले जाणार असल्याची माहिती पाेलिस उपायुक्त आर.राजा यांनी दिली आहे. तसेच त्यांच्या पालकांचे विराेधात याेग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे.