मुळा रोड व होळकर पूल परिसराची मनपा अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी
पुणे
बुधवार, १५ एप्रिल २०२६
पुणे शहरातील नद्यांमधील जलपर्णीच्या समस्येने रौद्र रूप धारण केले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज, १५ एप्रिल रोजी मुळा रोड आणि होळकर पूल परिसरातील नदीपात्राची पुणे महानगरपालिका आणि खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या अधिकार्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.
नदीच्या प्रदूषणाकडे आणि जलपर्णीकडे प्रशासनाचे लक्ष वेधताना आमदार शिरोळे म्हणाले की,
“जलपर्णीमुळे होणारी दुर्गंधी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. केवळ तात्पुरती मलमपट्टी नको, तर पर्यावरणाचा समतोल राखून शास्त्रीय पद्धतीने जलपर्णी कायमस्वरूपी कशी नष्ट करता येईल, यावर आमचा भर आहे. हा मुद्दा मी यापूर्वीही अनेकदा विधानसभेत उपस्थित केला असून प्रशासनाने आता युद्धपातळीवर काम करणे गरजेचे आहे.”
सध्या तातडीचा उपाय म्हणून मैन्युअल पद्धतीने नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
जलपर्णीमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. ही मोहीम राबवल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी आणि डासांपासून मोठा दिलासा मिळणार आहे.
भविष्यात जलपर्णी पुन्हा वाढू नये यासाठी इको-फ्रेंडली आणि तांत्रिक पद्धतींचा वापर करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यावेळी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, ड्रेनेज विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. मुळा आणि मुठा नद्यांना जलपर्णीमुक्त करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील, असा विश्वास आमदार शिरोळे यांनी यावेळी व्यक्त केला.








