आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे, दि. १६ ऑगस्ट २०२४: खेड तालुक्यातील कन्हेरसर परिसरातील १२ गावे व २५ वाड्यावस्त्यांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी कन्हेरसर २२०/३३ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून महावितरणच्या ३३ केव्ही क्षमतेच्या दोन नवीन वीजवाहिन्या कार्यान्वित झाल्या आहेत. खेड-आळंदीचे आमदार श्री. दिलीप मोहिते पाटील यांच्याहस्ते बुधवारी (दि. १४) या वीजवाहिन्यांचे उद्घाटन झाले. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजगुरुनगर विभाग अंतर्गत कन्हेरसर, दावडी, निमगाव, चिंचोशी, गुळाणी, वाकळवाडी, जरेवाडी, जऊळके बुद्रुक, गोसाशी, वाफगाव, वरुडे, गाडकवाडी, पूर या गावांसह २५ वाड्यावस्त्यांमधील ११ हजार २०६ ग्राहकांना दावडी व कन्हेरसर ३३/११ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. या दोन्ही उपकेंद्रांना सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मरकळ १३२/३३/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. मात्र अंतर अधिक असल्याने या उपकेंद्रांच्या वीजपुरवठ्यामध्ये नैसर्गिक व इतर कारणांमुळे व्यत्यय येत होता. तसेच जवळपास महापारेषणचे अतिउच्चदाब उपकेंद्र नसल्यामुळे पसिरातील ३७९२ कृषी, ६९१९ घरगुती, ४१८ वाणिज्यिक व २४० औद्योगिक व इतर ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यात काहीसे अडथळे येत होते.
तथापि, महापारेषणकडून कन्हेरसर येथे २२०/३३ केव्ही अतिउच्चदाबाचे उपकेंद्र कार्यान्वित झाले. त्यानंतर महावितरणकडून नवीन सहा वीजवाहिन्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले. त्यानुसार कन्हेरसर २२०/३३ केव्ही उपकेंद्रातून ३३ केव्हीच्या सहा वीजवाहिन्यांद्वारे दावडी, कन्हेरसर इन्फ्रा, रेऊ, डीटीए कन्हेरसर, निमगाव, मॅक्सिऑन या ३३/११ केव्ही उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी १७ कोटी ९९ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. यातील कन्हेरसर इन्फ्रा, डीटीए कन्हेरसर ३३ केव्ही वीजवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे.
कन्हेरसर येथे आयोजित कार्यक्रमात वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणने केलेल्या नियोजनाबाबत आमदार श्री. दिलीप मोहिते पाटील यांनी समाधान व्यक्त केले. खेड तालुक्यामध्ये विजेची व नवीन वीजजोडण्यांची मागणी सातत्याने वाढत विकासाच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. शेवटच्या घटकातील वीजग्राहकांपर्यंत महावितरणने सेवा देण्यासाठी तत्पर राहावे, असे आवाहन आमदार श्री. मोहिते पाटील यांनी केले. कन्हेसर परिसरातील वीजपुरवठ्यासाठी वीजवाहिन्यांचे अंतर कमी झाल्यामुळे तांत्रिक बिघाडांचे प्रमाण कमी होईल. बिघाड झाल्यास पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था उपलब्ध असेल. कृषी वीजवाहिन्यांवरील वीजभार कमी झाल्यामुळे कृषिपंपांना सुरळीत वीजपुरवठा होईल तसेच खेड सिटी एसईझेडमध्ये औद्योगिक ग्राहकांसाठी देखील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिली. या कार्यक्रमाला कन्हेरसरच्या सरपंच सौ सुनिता दत्तात्रय केदारी, अधीक्षक अभियंता श्री. युवराज जरग व श्री. विठ्ठल भुजबळ, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र येडके, उपकार्यकारी अभियंता श्री. विक्रांत ओहोळ, सहायक अभियंता श्री. आशिष तांबोळी आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.