स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर तिरंगा आणि फाळणी वेदना स्मृती विषयावरील तीनदिवसीय प्रदर्शन मोफत पाहण्याची संधी
पुणे, 14 ऑगस्ट 2024
माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे आणि पुणे मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन येथे आयोजित तीनदिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर तिरंगा आणि फाळणी वेदना स्मृती दिन या विषयावर आयोजित हे प्रदर्शन 14, 15 आणि 16 ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांसाठी मोफत खुले राहणार आहे.
प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले की देश विभाजित झाला त्यावेळी झालेली भारत पाकिस्तान फाळणी व त्यावेळी घडलेल्या घडामोडी आजच्या पिढीला माहिती होणे गरजेचे आहे. सर्व नागरिकांनी, युवकांनी व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन हर्डीकर यांनी यावेळी केले.
या चित्रपदर्शनीच्या माध्यमातून देशातील तरुणांना देशसेवेची प्रेरणा मिळेल तसेच ज्ञात व अज्ञात क्रांतीकारक व राष्ट्रपुरुषांच्या जीवनातील महत्वपूर्ण माहीती चित्रमय व मजकुर रुपाने प्रदर्शाच्या माध्यमातून नागरिकांना पहायला मिळणार असल्याचे मत केंद्रीय संचार ब्यूरोच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक निखिल देशमुख यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी, केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय, पुणेच्या विभागीय कलाकारांनी स्वातंत्र्यावर आधारित सांस्कृतिक गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. या चित्रप्रदर्शनीला महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, विनोद कुमार अग्रवाल, पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे व केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रंबधक डॉ. जितेंद्र पानपाटील आदी मान्यवर उपस्थित होते.