भाऊ दिलेली ओवाळणी परत घेतो असा दम देतो-मी टीका करताच माझ्या नवऱ्याला नोटीस येते
सोलापुर- आमदार रवी राणा यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सज्जड दम भरला आहे. भर सभेत रवी राणा यांचा लाडक्या बहीण योजनेवरील विधानाचा व्हिडिओ दाखवत त्यांनी इशारा दिला आहे. तू पैसे परत तर घेऊन बघ मग दाखवते काय तुझा कार्यक्रम करायचा ते, असे त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, रवी राणा यांनी एका सभेत बोलताना महायुतीला मते द्या, नाही तर लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून घेऊ असे वादग्रस्त विधान केले होते. यावरून सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सातत्त्याने या विधानावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष केले जात आहे.
शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज सोलापुरातील माढ्यात पार पडली आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावात शिवस्वराज्य यात्रेची सभा झाली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील यांनी संबोधित केले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी धडाकेबाज भाषण केले आहे. ”मी जय श्रीराम म्हणत नाही, मी मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम म्हणते”, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
त्यांनी यावेळी रवी राणा यांच्या विधानाचा व्हिडिओ भर सभेत ऐकवला आहे. त्या म्हणाल्या, ”बहिणीला सासरी सोडणारा भाऊ असतो. पण हा भाऊ दिलेली ओवाळणी परत घेतो, असा दम देत आहे. माझ्या राज्यातील बहिणीला असा दम कोणी दिला तर बहीण म्हणेल, नको बाबा तुझे 1500 रुपये ठेव तुलाच. मात्र राज्यातील बहिणींचा अशी धमकी कोणी देत असेल तर, तू पैसे परत घेऊन तर दाखव, बघते कसा कार्यक्रम करायचा ते”, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे.
तसेच यावेळी त्यांनी आमदार महेश शिंदे यांचा देखील व्हिडीओ भर सभेत दाखवला. त्या म्हणाल्या, ”अशा लोकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आपण देणार का? आपण एखाद्याला मदत करतो ती कपाळावर लिहून गावभर सांगायची नसते. आपल्याला फक्त सत्तेसाठी बदल नको तर दिल्लीसमोर न झुकणारे सरकार पाहिजे. दिल्लीसमोर मुजरा करणारे नाही. प्रत्येक गोष्टीला हे दिल्लीसमोर झुकतात”, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला. दरम्यान, डिसेंबरनंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणारच नाहीत असे विधान महेश शिंदे यांनी केले होते.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.” सरकारकडे अंगणवाडी सेविकांना देण्यासाठी पैसे नाहीत. पण 18 हजार कोटींची मेट्रो करण्यासाठी पैसे आहेत. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र बनवण्यासाठी मी जे काही करायला हवं ते करायला तयार आहे. मी सरकारवर टीका केली की माझ्या नवऱ्याला आयटीची नोटीस येते. मात्र त्यांना मी सांगितले आता निवडणूक होईपर्यंत रोज नोटीस येईल त्याची तयारी ठेवा”, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
देशात टॅलेंटची कमी नाही, एक गेला तर नवीन तयार करू
तसेच यावेळी त्यांनी जनतेला आवाहन केले आहे. ”मला साथ द्या. त्यासाठी मी पदर पसरते. निवडणूक दिवाळी आधी झाली तर 75 दिवस साथ द्या. दिवाळी नंतर झाली तर 90 दिवस मला द्या. मी प्रत्येकाचा मान सन्मान कायम करेन. देशात टॅलेंटची कमी नाही. एखादा सोडून गेला तर नवीन तयार करू. आई गेली तरी मुले जगायचे सोडत नाहीत. त्यामुळे देशात टॅलेंट भरपूर आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.