त्यांनी नगरसेवक होऊन दाखवावे – रोहिणी खडसे
सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे – रूपाली चाकणकर
मुंबई-आमच्याकडे सीडी आहे, असे म्हणत एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र त्यांची सीडी अद्यापही बाहेर आली नाही. वडील विधान परिषदेचे सदस्य आहेत ते देखील आता शरद पवार यांचा पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोणाचा कोणाला पायपोस नाही. वडिलांमुळे सोन्याचा चमचा घेऊन स्वतःचे कर्तृत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवले, अशांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार नसल्याचा पलटवार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षस रूपाली चाकणकर यांनी केला आहे. रूपाली चाकणकर यांच्यावर रोहिणी खडसे यांनी टीका केली होती, त्याला आता चाकणकर यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
स्वतःच्या पक्षाला फसवणारे आणि इतरांवर टीका करणाऱ्यांवरून त्यांची मानसिकता व बुद्धिमत्ता किती आहे हे लक्षात येते, अशा शब्दात रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांना सुनावले आहे. लोकसभा निवडणुकीत तुतारीचा प्रचार करण्याचे सोडून त्यांनी भाजपचा प्रचार केला, असा आरोप देखील रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्यावर केला आहे. वडिलांमुळे सोन्याचा चमचा त्यांच्या तोंडात होता. त्यामुळे स्वतःचं कर्तुत्व नसताना देखील त्यांना वडिलांच्या नावावर पद मिळाले, अशा शब्दात चाकणकर यांनी खडसे यांना सुनावले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय नेत्यांमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशाच प्रकारे रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली होती. रूपाली चाकणकर यांना आमदारकीचे डोहाळे लागले असल्याचे रोहिणी खडसे यांनी म्हटले होते. इतकंच नाही तर त्यांनी नगरसेवक होऊन दाखवावे नंतर आमदारकीचे स्वप्न पहावे, असे म्हणत रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांना डिचवले होते. त्याला देखील आता चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रूपाली चाकणकर यांनी जनसन्मान यात्रेदरम्यान सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. सुप्रिया सुळे यांना आता मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले आहेत, अशा शब्दात चाकणकर यांनी सुळे यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देताना रोहिणी खडसे यांनी चाकणकर यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे आता या दोन्ही महिला नेत्यांमधील वाद चांगलाच पेटला आहे.