पुणे-केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जात निहाय जनगणना करणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीतील मित्र पक्ष जातनिहाय जनगणना करण्यास कट्टीबद्ध आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाचा जातनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जात निहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्ण्य व्यवस्थेतच्या विचारधारेतून आलेल्या भाजपाच्या अनुराग ठाकूरांनी “ज्यांच्या जातीचा पत्ता नाही, ते जात निहाय जनगणेची मागणी करत आहेत” असे वक्तव्य करून या देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा अपमान करून भाजपची मनुवादी वृत्ती दर्शवली आहे.
ते पुढे म्हणाले,’ ‘ज्या समाजसुधारकांनी, महापुरुषांनी समाजातील वंचित, दलित, दीनदुबळ्यांचा आक्रोश मांडला, त्या सर्वांना अपमान, छळ, आदींना सामोरे जावे लागले. आज २१ व्या शतकातही ही मनुवादी वृत्ती कायम असल्याचे भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी दाखवून दिले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशात सामाजिक न्यायाचे रणशिंग फुंकले आहे. भारतीय जनता पक्षाने कितीही विरोध केला, शिव्या दिल्या, अडथळा आणला तरीही जातनिहाय जनगणना होणारच आणि ज्यांची जेवढी संख्या तेवढी त्यांना भागीदारी मिळणारच हे राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे. ज्यांची जात कोणती ते माहित नाही ते जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत असे वक्तव्य करून या देशातील बहुजनांचा अपमान करणा-या भारतीय जनता पक्षाविरोधात पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही निषेध करतो.’’
यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक लता राजगुरू, अजित दरेकर, मुख्तार शेख, वाल्मिक जगताप, सतिश पवार, लक्ष्मण तरवडे, सुनिल घाडगे, सुजित यादव, प्रदीप परदेशी, राजू ठोंबरे, हेमंत राजभोज, अजित जाधव, अक्षय माने, राज अंबिके, संदिप मोकाटे, शिवराज भोकरे, हर्षद हांडे, सीमा सावंत, छाया जाधव, शोभना पण्णीकर, बेबी राऊत, आदी उपस्थित होते.