मुंबईतून क्रिकेटही अहमदाबादला हलवले
मुंबई-भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामना होतो आहे. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. मात्र, या सामन्याचा राजकीय इव्हेंट केला जात असल्याचा आरोप करत संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, केंद्रात आणि राज्या-राज्यात मोदी सरकार आल्यापासून प्रत्येक गोष्टीचे राजकारण सुरू आहे. एखाद्याचा मृत्यू झाला किंवा खेळाचा उत्सव असला तरी त्या प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट होतोय. इथे मृत्युचाही इव्हेंट केला जातो, खोटे अश्रु ढाळले जातात. हा तर वर्ल्डकप आहे. इथे राजकारण कशाला आणायला हवे? पण अहमदाबादमध्ये याचा इव्हेंट सुरु आहे. जसं काय मोदी बॉलिंग टाकणार, शहा बॅटिंग करणार आहे आणि भाजपचे लोकं सीमारेषेवर उभे राहणार आहेत. नंतर आम्ही अशी बॉलिंग, बॅटिंग करायला सांगितले असून म्हणून श्रेयही घेतील, असा टोला राऊत यांनी लगावला.संजय राऊत पुढे म्हणाले की, पूर्वी मुंबई क्रिकेटची पंढरी होती. अशा प्रकारचे खेळांचे उत्सव दिल्ली, मुंबई किंवा कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर व्हायचे. पण मुंबईतून संपूर्ण क्रिकेट अहमदाबादला हलवण्यात आले. कारण त्यांना राजकीय इव्हेंट करायचा आहे. आज जर आपण जिंकलो तर मोदी होते म्हणून आपण जिंकलो, मोदी है तो वर्ल्डकप की जीत मुमकीन है, असे बोलायलाही ते कमी करायचे नाहीत.