पुणे – जीर्ण आणि मोडकळीस अवस्थेतील वाकडेवाडी आणि पांडवनगर या दोन महापालिकेच्या वसाहतींचे (पी एम सी कॉलनी) पुनर्निर्माण करावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे शनिवारी केली.
शहरात महापालिकेच्या ३० वसाहती (कॉलनी) आहेत. त्यापैकी छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघात वाकडेवाडी आणि पांडवनगर या दोन वसाहती आहेत. दोन्ही वसाहतींमधील इमारती जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या आहेत. त्यांची दुरूस्ती आणि देखभाल करणे पुरेसे होणारे नाही, त्या ऐवजी त्यांचे पुनर्निर्माणच होणे गरजेचे असल्याची भूमिका शिरोळे यांनी मांडली. पीएमसी कॉलनी वाकडेवाडी येथे शनिवारी एक दुर्दैवी घटना घडली, एका इमारतीच्या भिंतीचा एक भाग कोसळला. पण, सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, परंतु या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. ही घटना समजताच मी तिथे तात्काळ धाव घेतली, रहिवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. दुरुस्तीची तातडीची गरज ओळखून उपमुख्य मंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज मीना यांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या, अशी माहिती आ.सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
कॉलनीतील दुरुस्ती आणि देखभालीचे काम उद्यापासून (सोमवार) सुरू करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी वॉर्ड अधिकाऱ्यांना दिले आहेत. मला आशा आहे की, पीएमसी कॉलनीचे रहिवासी लवकरच सुरक्षित वातावरणात राहू शकतील आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रशासन कायमस्वरूपी उपाय योजना करेल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
या घटनेमुळे वसाहतींच्या केवळ डागडुजीपेक्षा पुनर्निमाणाची आवश्यकताच आहे, असे आ.शिरोळे यांनी सांगितले.