सद्यस्थितीत दिवा विझताना जशा फडफडतो, तशीच राज्य सरकारची गत झाली आहे. सरकारने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना चांगली आहे, पण उद्या निवडणूक झाल्यानंतर काय? त्यामुळे घोषणा करा, पण त्याला कायद्याचा आधार द्या, असा घणाघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी राज्य सरकारवर निशाणा साधताना केला. दंगल हेच भाजपचे धोरण असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.पृथ्वीराज चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, सद्यस्थितीत दिवा विझताना फडफडतो तशी राज्य सरकारची स्थिती झाली आहे. यूपीए सरकारने कायदा करून योजनांचा लाभ देण्याची सूचना केली होती. सरकारची लाडकी बहीण योजना चांगली आहे. पण उद्या निवडणूक संपल्यानंतर काय? सरकारने घोषणा करावी, पण तिला कायद्याचाही आधार द्यावा. आर्थिक स्थिती नसतानाही सरकार अशा घोषणा का करत आहे? हे सरकार आणखी किती कर्ज काढणार? 1 कोटीची घोषणा करायची आणि तरतूद केवळ 10 लाखांची करायची असे सध्या सुरू आहे. या सर्व घोषणा केवळ मतांसाठी केल्या जात आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर गत रविवारी दगडफेकीची घटना घडली होती. हल्लेखोरांनी तेथील प्रार्थनास्थळावरही हल्ला केल्याची माहिती आहे. यामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी दंगल हेच भाजपचे धोरण असल्याची तिखट टीका केली आहे. ते म्हणाले की, दंगली हेच सत्ताधारी भाजपचे धोरण आहे. राज्यात जातीय दंगल केल्याशिवाय निवडणूक जिंकता येणार नाही हे भाजप व संघाला ठावूक आहे. त्यामुळे ते हे धोरण राबवत आहेत.
जातीय ध्रुवीकरण थांबण्याची गरज
उपमुख्यमंत्री अजित पवार आज विशाळगड परिसरातील हिंसाग्रस्त भागाचा आढावा घेऊन पीडितांशी संवाद साधणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुद्यावरूनही सरकारवर निशाणा साधला. या प्रकरणी देखावा नव्हे तर प्रत्यक्ष कारवाई करण्याची गरज आहे. राज्य पेटले तर त्याचा फटका उद्योग व नोकऱ्यांना बसेल. त्यामुळे राज्यात सुरू असणारे जातीय ध्रुवीकरण थांबले पाहिजे. शांतता प्रस्थापित करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. आमच्या स्थानिक नेत्यांनी यापूर्वीच घटनास्थळाला भेट देऊन स्थितीचा आढावा घेतल्याची बाबही त्यांनी यावेळी प्रामुख्याने अधोरेखित केली.
पृथ्वीराज चव्हाण सध्या काँग्रेसच्या एका बैठकीसाठी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. तिथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
जागावाटपाची चर्चा बंद खोलीत होते
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत आमच्या 2 बैठका आहेत. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून ही बैठक होत आहे. सरकारचा चेहरा व जागावाटप या मुद्यावर जाहीर चर्चा करता येत नाही. ही चर्चा बंद खोळीत करावी लागते, असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले.