पुणे-राज्यात सद्यस्थितीत ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांसमोर उभा आहे. या सर्व घडामोडी घडत असताना राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची अचानक घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर राजकारणात खळबळ उडाली. मात्र, आज शरद पवार यांनी त्या भेटीमागील उद्देश देखील सांगितला.आरक्षणासंदर्भात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत विरोधक का सहभागी झाला नाही. विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव कसा झाला, रणनीती कुठे चुकली व बारामती लोकसभेतील लोक सुप्रिया सुळेंच्या पाठिशी कसे उभे राहिले यावर पवारांनी स्पष्ट भाष्य केले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
‘त्यांना’ घरात घेणार का?-अजित पवार यांनी बारामतीत विकास केला तरीही लोकसभेत सुप्रिया सुळेंना का मतं पडली? या पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार यांनी मिश्किलपणे उत्तर दिले, अरे ती बारामती आहे. लोकांशी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजे. याआधी मी फक्त शेवटची सभा घ्यायचो. परंतु यावेळी मी थोडा मतदारसंघात फिरलो. परंतु मी मतदारसंघातील 50 टक्के लोकांना नावाने ओळखायचो. पण आता जुनी लोकं नाहीत. मला खात्री होती की लोक सुप्रिया सुळेंनाच मतदान करतील, तेथील लोकांची मानसिकता मला माहिती आहे. त्यांना माझ्याविषयी देखील माहिती आहे. अजित पवारांनी घरवापसी केली, तर त्यांना पक्षात घेणार का, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, घरात सर्वांनाच जागा आहे, पण पक्षात मी व्यक्तिगत निर्णय घेणार नाही. संघर्षाच्या काळात अनेक जण मजबुतीने उभे राहिले. त्यांना विचारणार व निर्णय घेणार म्हणत पवारांनी हा विषय संपवला.
मुख्यमंत्री जरांगे यांच्यातील सुसंवाद माहिती नाही-छगन भुजबळ घरी आले, ते मला भेटले, त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत काही गोष्टी सांगितल्या. महाराष्ट्राचे हित हवं असेल तर तुम्ही या चर्चेमध्ये येण्याची गरज असल्याचे भुजबळ म्हणाले. मनोज जरांगे आणि मुख्यमंत्र्यामंध्ये का चर्चा झाली त्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. जरांगेचं उपोषण सुरू असताना काही मंत्र्याचं शिष्टमंडळ देखील गेले होते. त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यातील सुसंवाद आम्हाला माहिती नाही. त्यांची माहिती घेऊन पुढील बैठक घेतली जावी, अशी आमची मागणी आहे.
भुजबळांना का ताटकळतं थांबावं लागलं?शरद पवार म्हणाले की, भुजबळांची दोन भाषणं छान झाली. त्या आधी ते बीडला गेले. बारामतीतही चांगले भाषण केले. दोन्ही भाषणात माझ्याबद्दल आस्था आणि कौतुक व्यक्त केले. त्यानंतर ते मला भेटायला आले. मला ताप होता. मी दोन दिवस सुट्टी काढली. मला सांगण्यात आले की, भुजबळ साहेब आले आहेत. एका तासापासून तुम्हाला भेटल्याशिवाय जायचंच नाही म्हणतात. त्यानंतर ते आले मला त्यांनी काही गोष्टी सांगितल्या.
जयंत पाटलांचा पराभव, रणनीती कशी चुकली?शरद पवार म्हणाले, काँग्रेसकडे अधिकची मतं होती. आमच्याकडे बारा मतं होती. ठाकरे गटाकडे आमच्यापेक्षा जास्त मतं होती. काँग्रेसने पहिली मतं त्यांच्या उमेदवाराला देणं साहजिक होतं. पण, उरलेली पहिली आणि दुसऱ्या पसंती क्रमाची मतं योग्यपणे दिली असती तर तिन्ही उमेदवार निवडून आले असते. परंतु, आमची रणनीती चुकली. माझ्याकडे 12 मते होती. शेकापच्या उमदवाराला पाठिंबा द्यावा असं आम्हाला वाटत होतं. कारण, लोकसभा आम्ही डाव्या पक्षांसोबत लढवली होती. त्यांनी काही जागा मागितल्या होत्या, पण ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यामुळे जयंत पाटील यांना आम्ही पाठिंबा देण्याचे ठरवले होते. संधी आली तर डाव्यांना प्राधान्य द्यावं असं मला वाटत होतं.काँग्रेसची मतं जास्त होती. ठाकरेंकडे पुरेसी मतं नव्हती. पण, त्यांनी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. रणनीतीमध्ये मतभिन्नता होती. माझं व्यक्तिगत गणित वेगळं होतं. निवडून येण्यासाठी 23 मतं आवश्यक होती. काँग्रेसकडे माझं म्हणणं होतं, तुमच्या उमेदवाराला मतं देऊन उरलेली मतं 50 टक्के ठाकरे गटाला द्या आणि 50 टक्के मते जयंत पाटलांना द्यावे.
सामूहिकपणे जाताना तडजोड करावी लागते-लोकसभेत जास्त जागा घेऊन जास्त उमेदवार निवडून आणण्यात अपयश आले. विधानपरिषदेला ठाकरेंनी उमेदवार दिला. त्यामुळे मविआतील नेत्यांमध्ये हट्ट वाढला आहे का?, या पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षाचा थोडा स्वभाव असतो. कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता आपल्या पक्षाच्या हिताच्या दृष्टीने आग्रही भूमिका घेत असतात. थोडे अडजेस्ट करावे लागते. लोकांसमोर सामूहिकपणे जात असताना तडजोड करायच्या असतात. मात्र, त्यामुळे आम्ही अस्वस्थ झालोय, असे समजण्याचे कारण देखील नाही.
मविआत नेतृत्वावरुन संघर्ष नाही-जयंत पाटलांना विधानपरिषदेत उमेदवारी दिली असताना उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला. त्यामुळे मविआमध्ये नेतृत्वावरून संघर्ष आहे का असे विचारण्यात आले. असता शरद पवारांनी आमच्यात कोणताही संघर्ष नाही. तसेच निवडणुकीत आमचा उमेदवार नव्हता, तर जयंत पाटलांना आमची मते देऊ असे सांगितले होते. परंतु आमची रणनीती चुकली हे मान्य करावेच लागेल.