पुणे – आंतरराष्ट्रीय संबंध व भूअर्थकारणाशी निगडीत विविध घटकांचा समावेश असलेला नवीन अभ्यासक्रम फर्ग्युसन महाविद्यालयात या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येणार आहे.
हा नवीन अभ्यासक्रम ‘सर्टिफिकेट कोर्स’ असून त्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भूराजकीय (जिओपॉलिटिक्स) परिस्थिती, भारताचे परराष्ट्र धोरण व अर्थनीती, दहशतवाद व राष्ट्रीय सुरक्षा, पर्यावरण व विकासात्मक प्रश्न अशा विविध विषयांचा समावेश असणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पत्रकारिता, सामरिक रणनीती, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक व्यापार व वाणिज्य, व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत व्यावसायिक कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाचा फायदा होणार आहे. या अभ्यासक्रमाचे प्रारुप हे देशपातळीवर लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास अनुसरून आंतरविद्याशाखीय (इंटरडीसीप्लिनरी) पद्धतीने तयार करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांस भारतीय लष्करातील अधिका ऱ्यांसहित इतर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ अभ्यासकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
पदवी वा त्यापुढील कोणत्याही अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस हा कोर्स समांतर पद्धतीने करता येणार आहे. याबरोबरच, या अभ्यासक्रमातील परीक्षांचे स्वरूपही पारंपारिक पद्धतीपेक्षा वेगळे असणार असून त्यामध्ये मुलांमधील रोजगाराभिमुखता, संवाद कौशल्ये व व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जाणार आहे.
हा अभ्यासक्रम सुरु करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे बदलत्या काळातील सुरक्षाविषयक व धोरणात्मक आव्हानांवर योग्य प्रतिसाद देऊ शकणारे कुशल मनुष्यबळ घडवण्याचा असल्याचे मत फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले.