पडद्यामागील कलाकारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप
संवाद पुणे आणि रावी डिव्हाईसेसचा संयुक्त उपक्रम
पुणे : उज्ज्वल भवितव्य आणि यश संपादन करण्यासाठी आयुष्यात लक्ष्य निश्चित केले पाहिजे. यशप्राप्तीसाठी कठोर प्रयत्नांशिवाय पर्याय नाही, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
संवाद, पुणे आणि रावी डिव्हाईसेस इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील विविध नाट्यगृहांमधील पडद्यामागील कलाकारांच्या मुलांना शैक्षक्षिक साहित्याचे वाटप आज (रविवारी) बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात करण्यात आले. त्या वेळी हट्टंगडी बोलत होत्या. सुमारे 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी अभिनेत्री मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे यांच्यासह संवाद, पुणेचे सुनील महाजन, रावी डिव्हाईसेस इंडिया प्रा. लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर रवींद्र डोमाळे, डायरेक्टर अर्चना गोखले, केतकी महाजन-बोरकर, रणजित सोनवणे उपस्थित होते.
प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी उपक्रमाची माहिती दिली. पडद्यामागील कलाकारांच्या मुलांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य भेट दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुक्ता बर्वे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्वागत अर्चना गोखले, केतकी महाजन-बोरकर यांनी केले. प्रवीण बोडके, प्रविण बर्वे, निर्माते दिलीप जाधव उपस्थित होते.