पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या १२७ व्या गुरूपौर्णिमा महोत्सव सप्ताहात गीता धर्म मंडळाच्या सुमारे १०१ महिला साधकांतर्फे मुखोद्गत गीता पठण करण्यात आले. बुधवार पेठेतील दत्तमंदिर प्रांगणात उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उपक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी संस्कृत विभाग प्रमुख डॅा. शैलजा कात्रे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. हिंदू धर्माचा बीजग्रंथ असलेल्या श्रीमद् भग्वद् गीते मधील गुरूतत्व यावर त्यांनी निरूपण केले. महाभारताच्या ऐन युद्धभूमीवर परमात्मा श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला गीतोपदेश हा गुरू शिष्य नात्याचा परमोच्च बिंदू आहे. समग्र जीवनाचे तत्वज्ञान गीतेमध्ये समावले आहे असे त्यांनी श्रद्धापूर्वक सांगितले. विदूषी अनुजा चोपडे व सहकाऱ्यांनी सुमारे तीन तास मुखोद्गत गीतापठण केले.
ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे यांनी सर्वांचे स्वागत केले. विश्वस्त डॉ. पराग काळकर यांनी श्रीमती लक्ष्मीबाई यांच्या धर्मकार्याची प्रेरणा घेऊन महिलांचा जास्तीत जास्त सहभाग मंदिराच्या उपक्रमांत ठेवण्याचा ट्रस्टचा कटाक्ष असतो असे सांगितले. विश्वस्त ॲड. रजनी उकरंडे व हेमलता बलकवडे यांनी महावस्त्र अर्पण करून पठणकर्त्यांचा सन्मान केला. ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या १२७ वा गुरूपौर्णिमा महोत्सव
Date: