कोल्हापूर-किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आज सकाळीच संभाजीराजे छत्रपती आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह विशाळगडावर गेलेत. पण त्यांच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागल्याची शक्यता आहे. काही अज्ञात लोकांनी तेथील स्थानिकांवर दगडफेक केली असून, बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांवर सुद्धा हल्ला झाल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे.
विशाळगडगडावरील अनाधिकृत अतिक्रमणाविरोधात रविवारी सकाळी संभाजीराजे छत्रपती आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह विशाळगडाकडे जाण्यासाठी कोल्हापुरातील भवानी मंडप परिसरात जमले होते. यावेळी त्यांनी पिपाणी, हलकीचा ठेका, हाती भगवे झेंडे घेऊन ‘आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे’, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी भवानी मंडप परिसर दणाणून सोडला. त्यानंतर सर्वजण विशाळगडाकडे रवाना झाले. तत्पूर्वी, शाहीर आझाद नायकवडी यांनी विशाळगडाच्या इतिहासावर पोवाडा सादर केला.
कोणत्याही शुभ कार्याला, मोहिमेला जाताना मी अंबाबाई, भवानीचे दर्शन घेतो. सिद्दी जोहरने पन्हाळा गडाला वेढा दिला होता. तेव्हा शिवाजी महाराजांनी तेथून सुटका करून विशाळगडाला पोहोचले होते. त्यामुळे 13 जुलै रोजी पावनखिंड संग्राम दिन साजरा केला जातो. आज विशाळगड संकटात आहे. या गडाने शिवरायांना संरक्षण दिले. या विशाळगडाने स्वराज्याचे संरक्षण केले. ताराराणी यांची ही राजधानी होती. पण आता हा गड अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. हे अतिक्रमण आम्ही खपवून घेणार नाही, असे संभाजीराजे छत्रपती यावेळी बोलताना म्हणाले.
छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी अतिक्रमण मुक्त करण्याच्या मोहिमेत माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर मला अभिमानच वाटेल असेही स्पष्ट केले. मी एक शिवभक्त आहे. शिवाजी महाराजांना वंदन करण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही. मी विशाळगडावर यापूर्वीही गेलो होतो. आजही जात आहे. विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावा अशी आमची मागणी आहे. यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्याचा मला अभिमानच आहे, असे ते म्हणाले.
किल्ले विशाळगडावर कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू नये याबाबत प्रशासन दक्ष आहे. त्यानुसार विशाळगडावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे गडाला छावणीचे रूप आले होते. सध्या भाविकांसह पर्यटकांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शनिवारी रात्री उशिरा शिवभक्तांना सहकार्य करण्याचे व छत्रपती संभाजीराजे यांना चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासन आजही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहे, असे ते म्हणाले.
विशाळगडावरील अतिक्रमणांचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही माजी खासदार संभाजीराजेंनी घेतलेली आंदोलनाची भूमिका अनाकलनीय आहे. संभाजीराजेंनी याबाबत राजकारण न करता राज्यातील सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे काढावित अन्यथा हिंदुत्ववादी संघटना वक्फ बोर्डाच्या जागांवर मंदिरे बांधतील, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी दिला होता.विशाळगडावरील वाद दोन धर्मातील नाही तो केवळ अतिक्रमणांचा आहे. दोन्ही धर्मियांची अतिक्रमणे आहेत. सर्वच अतिक्रमणे काढून गड स्वच्छ आणि सुरक्षित करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे. त्यामुळे कोणीही आक्षेपार्ह व्हिडिओ, मेसेज तयार करून ते सोशल मीडियात व्हायरल करू नयेत, असे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहे.