पुणे-विधानपरिषदेत झालेला घोडाबाजार धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया पुणे महापालिकेतील स्थायी समिती च्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांनी दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे कि,’राजकारणात स्वच्छ प्रतिमा ठेवून नेतृत्व करणं किती महत्त्वाचं असतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. काल झालेल्या विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत ‘शेकाप’चे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. या पराभवात अनपेक्षित अस काहीच नव्हतं. कारण सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचे नीती आणि नियम सर्व बाजूला करून ठेवले आहेत तर मग दुसरं काय घडू शकत. मात्र, महाविकास आघाडीने कोणतीही चुकीची गोष्ट न करता, लोकशाहीला अनुसरून प्रामाणिक, कुठलाही पक्षफूट न करता अगदी नीती-नियमाने ही निवडणूक लढली यातूनच आपल्या पक्षाची उत्तम प्रतिमा आणि एकनिष्ठपणा लक्षात येतो. मागील काही वर्षांपासून घोडेबाजार करून विजय मिळवणं ही विरोधकांची सवयच होऊन बसली आहे. सत्तेतील लोकांनी आपल्या प्रतिनिधींना थेट अलिशान हॉटेलमध्ये नेऊन त्यांची बडदास्त ठेवली. जनतेच्या पैशाचा अमाप अपव्यय आणि पराभव होण्याची भिती यामुळे कोणत्याही थराला जाऊन सत्ताधारी वागत आहेत हेच यावरून दिसले. स्वकर्तृत्वावर निवडून येणं हे कठीण होत असल्यानं अशा प्रकारचं राजकारण सध्याला दिसून येतं. मात्र, कोणतीही परिस्थिती येवो, आपला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या मार्गाचा अवलंब कधीच करणार नाही. मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सदस्या आहे. नगरसेविका तसेच महानगरपालिकेतील महत्त्वाच्या पदांवर मी काम केलेलं आहे. मात्र, अशा गैरमार्गाचा वापर करून कधीच आपण राजकारण केले नाही. आदरणीय शरद पवारसाहेबांची शिकवण ही कायम प्रामाणिक राहा आणि पक्षनिष्ठ राहा अशीच राहिली आहे. त्यामुळे राजकारणात कोणताही चुकीच्या गोष्टी न करता नागरिकांना उपयोग होईल असं समाजकारण करणं हे मी माझे कर्तव्य समजते.