आमदार उमा खापरे यांचा निषेध
पुणे :’पंडिता रमाबाई मुक्ती मिशन मध्ये धर्मांतर होत असल्याच्या मुद्दा विधानसभेत आणि प्रसारमाध्यमात आला असला तरी राजकिय हेतुने मुक्ती मिशनची बदनामी करण्याकरिता तसेच अल्पसंख्यांक संस्थांना विनाकारण बदनाम करण्याच्या हेतुने ही दिशाभुल करण्यात आलेली आहे.पंडिता रमाबाई मुक्ती मिशन मध्ये धर्मांतर होत नाही’, असे स्पष्टीकरण पंडिता रमाबाई मुक्ती मिशनचे माजी अध्यक्ष मार्कस देशमुख यांनी दिले आहे. आज पुण्यात त्यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
‘मिशनवरील आरोप हा भाजप प्रणीत आमदाराचा विधान सभेची निवडणुक डोळयासमोर ठेवुन प्रसिध्दी मिळविण्याकरीता केलेला डाव आहे. यामध्ये अल्पसख्यांक संस्थाच्या जमिनी लाटण्याकरीता दबावतंत्राचा वापर करून संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न हेतूपुरस्सर करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान देखील मिशन विरुद्ध असा प्रचार करण्यात आला होता’, असे देशमुख यांनी या पत्रकात म्हटले आहे.
‘संबंधित दोन्ही मुलींना बाल कल्याण समितीच्या द्वारे प्रवेश देण्यात आला होता. खापरे यांनी पोलीस यंत्रणा व बाल कल्याण समितीवर केलेला आरोप हा बिनबुडाचा असुन खोटा व तकलादू आहे. संस्थेत दर महिन्याला बारामतीच्या सत्र न्यायालयाच्या महिला न्यायाधीश भेट देतात व पाहणी करतात. तसेच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची देखील संस्थेला भेट देत असतात.
पंडीता रमाबाई मुक्ती मिशनच्या संस्थापिका पंडिता रमाबाई यांनी १३५ वर्षापुर्वी संस्थेची स्थापना केली आणि तेव्हापासुन अनाथ विधवा ,स्त्रिया , मुलींचे निस्वार्थरीत्या सेवा केली जाते व आजही ही सेवा अवीरत चालु आहे. संस्थेला शासनाचे कसलेच मानधन किंवा अनुदान मिळत नाही. समाजातील लाखो मुलामुलीचे शिक्षण व संगोपन आजतागायत झाले आहे व सर्वांना स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची संधी आज मुक्ती मिशनमुळेच त्यांना मिळाली आहे’, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
‘माझा स्वतःचा जन्म मुक्ती मिशन मध्येच झाला व याच संस्थेचा सात वर्षे अध्यक्ष होण्याचा मान देखील मिळाला. माझ्या अध्यक्ष पदाच्या काळात देखिल साधारणता २०१४ ते २०१६च्या दरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या कारणावरून पंडिता रमाबाई मुक्ती मिशनचे अस्तीत्व नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंडिता रमाबाईची खोली देखिल पाडण्याचा व संस्थेचे प्रार्थना मंदिर उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. माझ्यासारखे अनेक ख्र्ीस्ती समाजाचे लोक असे प्रकार खपवुन घेणार नाही. कारण पंडिता रमाबाई मुक्ती मिशन हे संपुर्ण देशाचे भुषण आहे व धार्मिक स्थळ आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयांना अधिकार दिला आहे. त्यानुसार येथील काम चालते.पंडिता रमाबाई मुक्ती मिशनचा कारभार पारदर्शक पध्दतीने घटनेने दिलेल्या अधिकाराने चालविला जातो.आमदार उमा खापरे यांचा संपुर्ण खिस्ती समाजाच्या वतीने आम्ही निषेध करतो’,असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.